‘जस्टिस फॉर निम्रिता’ मोहिमेत सामिल झाला शोएब अख्तर


इस्लामाबाद – निम्रिता चंदानी नामक हिंदू मुलीचा पाकिस्तानमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. सोशल मीडियावर निम्रिताच्या मृत्यूनंतर तिला न्याय मिळावा, यासाठी ‘जस्टिस फॉर निम्रिता’ मोहिम सुरू करण्यात आली आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरही या मोहिमेमध्ये सामिल झाला आहे. निम्रिता मृत्यू प्रकरणातील दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्याने केली आहे.

पाकिस्तानच्या लारकाना शहरात बिबी असिफा डेंटल कॉलेजमध्ये निम्रिता वैद्यकीय शिक्षणाचे धडे गिरवत होती. कॉलेजच्या वसतिगृहाच्या खोलीमध्ये सोमवारी निम्रिताचा मृतदेह आढळला. दरम्यान, व्देष भावनेतून निम्रिताची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात असल्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे.


निम्रिताला न्याय मिळावा, यासाठी सोशल मीडियावर ‘जस्टीस फॉर निम्रिता’ मोहिम सुरू करण्यात आली आहे. शोएब अख्तरही या मोहिमेत सहभागी झाला. या घटनेबाबत त्याने तरुण आणि निरागस अशा निम्रिताच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेमुळे मला खूपच दु:ख झाले आहे. या प्रकरणात तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल आणि तिच्या मारेकऱ्यांना नक्कीच शासन केले जाईल, असा मला विश्वास आहे. कोणत्याही विचारसरणीचा असला, तरी प्रत्येक पाकिस्तानी हा माझ्यासाठी महत्वाचा आहे. देव तिच्या आत्म्यास शांती देवो, अशा आशयाचे ट्विट अख्तरने केले आहे.

Leave a Comment