पिंडदानासाठी मृताच्या नावे रेल्वे रिझर्वेशन


भारतीय भावनाशील आहेत हे खरेच. देशात कोणत्या कारणाने कुणाच्या भावना दुखावतील हे सांगणे जसे अवघड तसे भावनेच्या आहारी जाऊन कोण काय कृत्य करेल हे सांगणेही अवघड आहे. सध्या देशात पितृपंधरवडा सुरु आहे. या काळात घरातील मृत व्यक्तीला पिंडदान करून त्याच्या मोक्षाचा मार्ग मोकळा करण्याची प्रथा भारतात आहे. बिहारमधील गया येथे या दिवसात पिंडदान केले तर आत्म्याला मोक्ष मिळतो अशी भारतीयांची श्रद्धा आहे. त्यामुळे या पंधरा दिवसात गया येथे मोठी गर्दी जमते.

विशेष नवलाची बाब म्हणजे देशभरातून लोक येथे पितरांचे पिंडदान करण्यासाठी येतात. अनेकांना रेल्वे प्रवास करावा लागतो. विशेष म्हणजे त्यावेळी मृत माणसाच्या नावाचा बर्थ रेल्वेत रिझर्व केला जातो. बांबू आणि त्याला नारळ बांधून पितर म्हणून रेल्वेत सोबत आणला जातो आणि त्या पितरच्या नावाचा जो बर्थ रिझर्व केला आहे तेथे तो ठेवला जातो. पूर्वजांच्याबद्दलचा आदर आणि त्यांच्याविषयी प्रेम यातून त्यांना आपल्यासोबत गयेला नेण्याची ही प्रथा आहे.

अर्थात हा सगळा विधी पिंडदानाला निघण्यापूर्वी सात दिवस सुरु होतो. त्यासाठी घरात बांबू नारळ आणून त्यावर संस्कार केले जातात, गीता पाठ केला जातो. अगोदर या मृताच्या नावाचे रिझर्वेशन करून मग घरातील बाकीच्यांची रिझर्वेशन केली जातात. तयार करून आणलेला पितृदंड बर्थ वर ठेवला जातो आणि लहान बाळाप्रमाणे त्याची काळजी घेऊन त्याला गयेला नेले जाते. रात्रीचा प्रवास असेल तर कुटुंबीय दोन दोन तास या पितृदंडाचा पहारा करतात. आणि या पद्धतीने गयेला पितृदंड आणून त्याचा श्राद्धविधी आणि पिंडदान केले जाते.

Leave a Comment