अमित शहांनी त्या वक्तव्यावरुन मारली पलटी


नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदी भाषेवर केलेल्या वक्तव्यानंतर आपल्या त्या वक्तव्यावरुन पलटी मारत प्रादेशिक भाषांऐवजी हिंदीची सक्ती करा असे मी कधीही म्हणालो नव्हतो. फक्त आपल्या मातृभाषेनंतर दुसरी भाषा म्हणून हिंदी भाषा शिकली पाहिजे असे म्हणालो होतो, म्हटले आहे.

ज्या राज्यातून मी आलो, त्या गुजरातची भाषा देखील हिंदी नसल्यामुळे हिंदीची सक्ती करण्याविषयी मी बोलू शकत नाही. तरीही, या मुद्याचे कोणाला राजकारण करायचे असल्यास, तो त्यांचा प्रश्न असल्याचेही ही त्यांनी यावेळी म्हटले. गृहमंत्री अमित शहा यांनी यावर्षीच्या हिंदी दिनानिमित्त, हिंदी भाषेच्या माध्यमातून संपूर्ण देशाला जोडण्याचे आवाहन केले होते. देशाला एका भाषेची गरज आहे, जेणेकरून परेदशी भाषांना भारतामध्ये स्थान मिळणार नाही, असे अमित शहा एका कार्यक्रमामध्ये म्हणाले होते.

‘एक देश-एक भाषा’ असा नारा यावेळी त्यांनी दिला होता. पण शहा यांना यामुळे मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले. ‘एक देश- एक भाषा’ला बऱ्याच राजकीय पक्षांनी, नेत्यांनी आणि कलाकारांनी चांगलाच विरोध दर्शविला. भारताच्या विविधतेतील एकतेमध्ये भारताचे सौंदर्य आहे. या विविधतेचा एक अंग म्हणजेच या भाषा असल्याचे म्हणत लोकांनी ‘एक देश-एक भाषा’ या धोरणावर चांगलीच टीका केली होती.

Leave a Comment