वयाच्या ४२ व्या वर्षी निवृत्त झाला हा अष्टपैलू खेळाडू


नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा दादा अर्थात सौरव गांगुली याच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या दिनेश मोंगियाने निवृत्तीची घोषणा केली आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी २००३ मध्ये विश्वचषक खेळणारा मोंगिया निवृत्त झाला आहे.

अष्टपैलू खेळाडू म्हणून डावखुरा दिनेश मोंगिया हा ओळखला जायचा. १९९६ मध्ये त्याने पंजाब संघाकडून क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मोंगियाने २००३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात १५९ धावांची दमदार खेळी केली होती. पण विश्वचषकात त्याला कोणतीही खास कामगिरी करता आली नाही. त्याने शेवटचा एकदिवसीय सामना २००७ मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला होता.

बीसीसीआयच्या मान्यता नसलेल्या इंडियन क्रिकेट लीगमध्ये मोंगियाने प्रवेश केला होता. त्यामुळे या लीगमध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंवर बीसीसीआयने बंदी घातली होती. भारताकडून ५७ एकदिवसीय आणि एका टी-२० सामन्यामध्ये त्याने प्रतिनिधीत्व केले होते. आपल्या कारकिर्दीमध्ये त्याने १२६८ धावा केल्या आहेत. १९९६ ते २००७ या काळात त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १९८ सामने खेळताना ५५४४ धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याने २६ अर्धशतके आणि १० शतके ठोकली आहेत.

Leave a Comment