युरोपीय महासंघाने पाकला झापले; चंद्रावरुन येत नाहीत भारतात दहशतवादी


नवी दिल्ली – युरोपीय महासंघाने काश्मीरप्रकरणी दुष्प्रचार करत आंतरराष्ट्रीय मुद्दा करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. पाकिस्तानवर युरोप महासंघाच्या अनेक सदस्यांनी एकसुरात कठोर शब्दांत टीका केली. भारताला आपण पाठिंबा दिला पाहिजे कारण दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये संरक्षण मिळते आणि ते शेजारी देशात हल्ले करतात, असे या सदस्यांनी म्हटले आहे. पाकने हा मुद्दा जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० संपुष्टात आणल्यानंतर आंतरराष्ट्रीय मंचावर उपस्थित करण्याचा प्रयत्न सुरु केला असला तरी ते सातत्याने तोंडावर पडताना दिसत आहेत.

११ वर्षांत पहिल्यांदाच युरोपीय महासंघाने काश्मीर मुद्द्यावर चर्चा केली आणि जाहीररित्या भारताचे समर्थन केले. या दरम्यान पाकिस्तानवर दहशतवादावरुन टीकाही केली. पोलंडचे नेते आणि महासंघाचे सदस्य रिजार्ड जार्नेकी संसदेत चर्चेदरम्यान म्हणाले की, जगातील सर्वांत महान लोकशाहीचा भारत देश आहे. भारताच्या जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या दहशतवादी घटनांकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. भारतात घुसणारे दहशतवादी हे काही चंद्रावरुन येत नाहीत. ते शेजारील देशातूनच (पाकिस्तान) येत आहेत. अशावेळी भारताचे आपल्याला समर्थन केले पाहिजे.

अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी पाकिस्तान देत असल्याचे, इटलीचे नेते आणि युरोपीय महासंघाचे सदस्य फुलवियो मार्तुसिलो यांनी सांगितले. स्थानिक हल्ल्यांचा उल्लेख करत पाकिस्तानातच युरोपमध्ये दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला जातो, असा आरोप करत काश्मीर मुद्द्यावर भारत आणि पाकिस्तानने चर्चा करुन यावर शांततेत तोडगा काढला पाहिजे, असे ते म्हणाले.