रेल्वेच्या 11 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार 78 दिवसांचा बोनस


नवी दिल्ली – भारतीय रेल्वे विभागातील 11 लाख कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर करण्यात आला असून 78 दिवसांचा पगार या सर्वच कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून दिला जाणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी दिली आहे. ही घोषणा मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर करण्यात आली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या या बोनसमुळे सरकारी तिजोरीवर 2,024 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे अशी माहिती जावडेकर यांनी दिली आहे.

दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी ई-सिगारेटवर बंदी घालण्याला मंजुरी दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकारांना ही माहिती केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली. ई-सिगारेटच्या उत्पादनाला, आयात/निर्यातीला, वाहतुकीला, विक्रीला, साठवणुकीला आणि जाहिरात करण्याला बंदी घालण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

या बंदीचे उल्लंघन केल्यास पहिल्यांदा एक वर्षापर्यंत तर दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर उल्लंघन केल्यास तीन वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. ई-हुक्कावरही बंदीच असणार आहे, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

Leave a Comment