मोदींचा संदेश असलेल्या मोमेंटोला १ कोटींची बोली


बेस प्राईज ५०० रुपये असलेल्या मोदी यांच्या गुजराथी संदेशाच्या मोमेंटोला लिलावात तब्बल १ कोटींची बोली लागली. दिल्लीच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट मध्ये पंतप्रधान मोदी यांनी भेट म्हणून मिळालेल्या वस्तूंचा लिलाव १४ सप्टेंबरपासून सुरु झाला असून तो ३ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यातून मिळालेली रक्कम नमामि गंगे या गंगा स्वच्छता अभियानासाठी दिली जाणार आहे.

याच लिलावात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी मोदी यांना दिलेल्या चांदीच्या कलशाला १ कोटीची बोली लागली. या कलशाची बेस किंमत १५०० रुपये ठरविली गेली होती. वासराला दुध पाजणाऱ्या गाईच्या मूर्तीला ५१ लाख रुपये मिळाले तर लाकडी बीएमडब्ल्यू कार प्रतिकृतीला ५ लाख रुपये बोली मिळाली. या वस्तूंमध्ये खंजीर, पगड्या, पेंटींग्स, शोल्स अश्या २७२२ विविध वस्तू आहेत. त्याच्या बेस प्राईज २०० पासून अडीच लाखापर्यंत आहेत. पहिल्या २० बड्या ग्राहकांना मोदींकडून प्रोत्साहन पत्र दिले जाणार आहे.

यापूर्वी मोदी यांना अश्याच भेट मिळालेल्या १८०० वस्तूंचा फेब्रुवारीत लिलाव केला गेला होता. २०१५ साली मोदी यांनी घातलेल्या सुटचा लिलाव केला गेला तेव्हा गुजराथच्याच लालजी पटेल या हिरे व्यापाऱ्यांनी तो सुट ४.३१ कोटी रुपयांना खरेदी केला होता.

Leave a Comment