ही आहेत जगातील सर्वात सुरक्षित शहरे


सिंगापूर : जपानची राजधानी असलेल्या टोकियोने जगातील सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीमध्ये आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. भारताची राजधानी आणि आर्थिक राजधानी मात्र साठ देशांमधील शहरांचा समावेश असलेल्या या यादीत तळाला आहेत. या क्रमवारीत मुंबई 45 व्या, तर दिल्ली 52 व्या नंबरवर आहेत.

आकारमानाने आणि लोकसंख्येच्या दृष्टीने जगभरातील शहरांमध्ये वाढ होत आहे. सरकार, खासगी क्षेत्र आणि नागरिकांसाठी अशावेळी सुरक्षा आणि गोपनीयता यांच्यात संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांनी सिंगापूरमध्ये आयोजित सुरक्षित शहर याविषयी मंथन केले. सर्वात सुरक्षित शहरांची क्रमवारी इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने जाहीर केली आहे.

जगातील सर्वात सुरक्षित अशा शहरांची यादी तयार करण्यात आली असून या क्रमवारीत उगवत्या सूर्याचा देश अशी ओळख असलेल्या जपानच्या राजधानीने अव्वल स्थान पटकावले आहे. पाच खंडातील 60 देशांमधील विविध शहरांचा विचार यासाठी करण्यात आला.

पहिल्या क्रमांकावर टोकियो, दुसऱ्या क्रमांकावर सिंगापूर, तर तिसऱ्या क्रमांकावर ओसाका आहे. मुंबई 45 व्या, तर दिल्ली 52 व्या नंबरवर आहेत. जपानमधील दोन शहरांसह तिन्ही आशियाई शहरांचा टॉप तीनमध्येच समावेश आहे. टोकियो या यादीत गेल्या तीन वर्षांपासून पहिल्या क्रमांकावर कायम आहे.

या क्रमवारीसाठी आरोग्य सुरक्षा, पायाभूत सुविधांची सुरक्षितता, वैयक्तिक सुरक्षा आणि स्मार्ट सिटी तंत्रज्ञानाची सायबर सुरक्षा हे निकष वापरण्यात आले होते. अव्वल दहामध्ये यूएस मधील एकाही शहराला स्थान पटकावता आलेले नाही. या यादीत सॅन फ्रान्सिस्को 15 व्या नंबरवर आहे. तर या यादीत गेल्या वेळी दहाव्या क्रमांकावर असलेले न्यूयॉर्क 21 व्या क्रमांकावर फेकले गेले आहे.

टॉप 10 सुरक्षित शहरांची यादी
1. टोकियो (जपान)
2. सिंगापूर (सिंगापूर)
3. ओसाका (जपान)
4. टोरंटो (कॅनडा)
5. मेलबर्न (ऑस्ट्रेलिया)
6. अॅमस्टरडॅम (नेदरलँड)
7. सिडनी (ऑस्ट्रेलिया)
8. स्टॉकहोम (स्वीडन)
9. हाँग काँग
10. झुरिच (स्वित्झर्लंड)

Leave a Comment