4 ऑक्टोबरपासून धावणार देशातील पहिली खाजगी ट्रेन


लखनऊ : पुढील महिन्याच्या 4 तारखेपासून देशातील पहिली खाजगी ‘तेजस एक्स्प्रेस’ ट्रेन धावणार आहे. भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिजम कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे ही ट्रेन संचलित केली जाणार आहे. या ट्रेनला हिरवा झेंडा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते दाखवला जाणार आहे.

तेजस एक्सप्रेस ही ट्रेन सुरुवातीला लखनऊ ते दिल्ली दरम्यान धावणार होती. हा प्रवास ट्रेन 6 तास 15 मिनिटात पूर्ण करेल. लवकरच अशीच एक ट्रेन मुंबई ते अहमदाबाद सुरु केली जाणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे. पूर्णपणे आयआरसीटीसीच्या हातात दिल्ली ते लखनऊ दरम्यान धावणाऱ्या या ट्रेनचे संचलन असेल. प्रवाशांना या ट्रेनमध्ये अत्याधुनिक सुविधा मिळतील आणि पहिल्यांदाच एका खाजगी कंपनीद्वारे ही ट्रेन चालवली जाणार आहे.

25 लाख रुपयांचा विमा तेजस एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिला जाईल. या ट्रेनच्या प्रवाशांना लखनऊ जंक्शनवर प्रतीक्षालय आणि नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर एग्जिक्यूटिव्ह लाऊंजची सुविधा उपलब्ध असेल. याशिवाय रेल्वे प्रवाशांचे सामान स्टेशन ते घर आणि घर ते स्टेशनपर्यंत पोहचविण्याची सुविधाही देणार आहे पण यासाठी वेगळे पैसे आकारले जाईल.

पाण्याची बॉटल प्रवाशांना दिली जाईल. त्यासोबतच एका कोचमध्ये आरओची सुविधा असेल. यामध्ये बॉटल रीफिल केली जाऊ शकते. कोणतीही सूट अथवा पास या ट्रेनमध्ये लागू नसेल. पाच वर्षाच्या वरील मुलांसाठी तिकीट असेल. तसेच तात्काळ तिकीचाची सुविधा नसेल. तसेच परदेशी नागरिकांसाठी विशेष कोच उपलब्ध असेल, असे आयआरसीटीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

या ट्रेनचे संचलन येत्या 4 ऑक्टोबरला सुरु होणार असून नोव्हेंबरमध्ये मुंबई ते अहमदाबाद ट्रेन सुरु होणार आहे. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया ज्याप्रकारे एअरपोर्ट चालवतात, त्याप्रकारे प्रायव्हेट कंपन्या ट्रेन चालवणार आहेत, अस रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

Leave a Comment