सरकारचे हे पोर्टल देणार चोरीला गेलेल्या फोनची माहिती


दूरसंचार विभागाने मोबाईल फोन चोरीला गेल्यावर अथवा हरवल्यावर तक्रार करण्यासाठी नवीन पोर्टल लाँच केले आहे. या नवीन पोर्टलच्या मदतीने युजर्स आपला मोबाईल ट्रॅक करू शकतील. दूरसंचार विभागाने CEIR (सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर) पोर्टल लाँच केले आहे.  हा प्रोजेक्ट सुरूवातीला महाराष्ट्रात लाँच करण्यात आला असून, नंतर हा प्रोजेक्ट संपुर्ण देशभरातील मोबाईल युजर्ससाठी लाँच करण्यात येईल.

दूरसंचार विभाग या प्रोजेक्टवर 2017 पासून काम करत आहे. या प्रोजेक्टमध्ये ग्लोबल IMEI नंबर फीड केले जात आहेत. याच्याद्वारे क्लोन करण्यात आलेल्या IMEI नंबरला ट्रेल केले जाऊ शकेल. या पोर्टलवरील डाटाबेसच्या आधारावरच मोबाईल फोन चोरी अथवा हरवला असेल तर तो ट्रेस करता येईल.

दूरसंचार विभागाने 2017 पासून 15 डिजीट IMEI नंबर फीड करण्यास सुरूवात केली आहे. या प्लॅटफॉर्मवर युजर्स हरवलेला अथवा चोरी गेलेला मोबाईल नंबर ब्लॉक करू शकतील. या प्लॅटफॉर्ममुळे चोरी झालेला स्मार्टफोन एक्सेस करणे शक्य होणार नाही.

अशी करू शकता तक्रार – मोबाईल फोन हरवला अथवा चोरीला गेला तर सर्वात प्रथम युजरला एफआयआर दाखल करावी लागेल. त्यांतर दूरसंचार विभागाच्या 14422 या हेल्पलाईन नंबरवर माहिती द्या. पोलिस तक्रारीनंतर डिपार्टमेंट त्या डिव्हाईसला ब्लॅकलिस्ट करेल. यानंतर जर कोणी दुसरे सिमकार्ड वापरून डिव्हाईस वापरण्याचा प्रयत्न केला तर सर्विस प्रोव्हाईडरला याची माहिती जाईल आणि पोलिसांना कळवले जाईल.