या कंपनीत कर्मचारीच ठरवतात स्वतःचा पगार


लंडनमधील एका कंपनीने चक्क कर्मचाऱ्यांनाच स्वतःचा पगार ठरवण्याची परवानगी दिली आहे. या कंपनीचे नाव ग्रांटट्री असे आहे. ही कंपनी बिझनेस कंपन्यांना सरकारी फंड मिळवून देण्यास मदत करते. ग्रांटट्रीमधील एका महिलेने तर तिचा पगार हा 6 लाखांनी वाढवून वर्षाला 33 लाख रूपये केला आहे.

ग्रांटट्रीमध्ये काम करणाऱ्या 25 वर्षीय सीसिलिया मंडुकाने सांगितले की, पगार 6 लाखांनी वाढवण्याआधी तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना पगार वाढवण्यासंबंधी आपल्या सहकर्मचाऱ्याबरोबर चर्चा करावी लागत असते. सीसिलिया यांनी सांगितले की, त्यांना माहित होते की त्यांचे काम खूप वाढले आहे व त्या टार्गेटच्या खूप पुढे निघून गेल्या आहेत. जेव्हा तिने सहकर्मचाऱ्यांशी याबद्दल चर्चा केली, तेव्हा त्यांनी देखील तिचा पगार वाढवण्यासंबंधी पाठिंबा दिला.

ग्रांटट्री कंपनीमध्ये जवळपास 45 कर्मचारी काम करतात. सर्व कर्मचारी स्वतः स्वतःचा पगार ठरवतात. हवे तेव्हा ते आपल्या पगारात बदल करू शकतात. मात्र पगार वाढवण्याआधी कर्मचारी त्यांच्या सारखे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला किती पगार आहे, याची माहिती घेतात. याचबरोबर पगार वाढवण्याआधी कर्मचारी स्वतः किती प्रगती केली आहे आणि कंपनी किती अफोर्ड करू शकते याचा देखील विचार करतात. त्यानंतर कर्मचारी पगार वाढवण्यासाठी प्रपोजल समोर ठेवतो व अन्य स्टाफ त्याला रिव्यू देतो. इतर कर्मचारी केवळ फिडबॅक देतात. पगार हा कर्मचारी स्वतः ठरवतो.

Leave a Comment