ओदनथुराई – स्वयंपूर्ण गाव पंचायतीची कहाणी


गावाचा विकास म्हटले की सरकारने मदत केली पाहिजे ही अपेक्षा आलीच. तामिळनाडूच्या कोईमतूर पासून ४० किमीवर असलेल्या ११ गावांचा समावेश असलेल्या ओदनथुराई पंचायतीने इच्छा तेथे मार्ग असल्याचे झणझणीत उदाहरण देशाला घालून दिले आहे. दृढ मनोबल असले तर काहीही अशक्य नाही याचे ही पंचायत जितेजागते उदाहरण बनली असून तिला भेट देण्यासाठी केवळ देशातील सरकारी अधिकारीच नाही तर ४३ देशातील विद्यार्थी आणि अनेक परदेशी तज्ञ येऊन गेले आहेत.

या पंचायतीच्या अख्यत्यारीतील सर्व ११ गावात पक्की घरे, कॉन्क्रीट रस्ते, चोवीस तास मोफत वीज, दर १०० मीटरवर पाण्याची व्यवस्था आणि प्रत्येक घरात शौचालय आहे. आदर्श गावाचा हा उत्तम नमुना. विशेष म्हणजे या गावात पवन आणि सौरउर्जा वापरून जी वीज बनते ती गावाची गरज भागवून तामिळनाडू वीज मंडळाला विकली जाते आणि त्यातून पंचायत दरवर्षी १९ लाख रुपये कमाई करते. हा पैसा गावाच्या विकासासाठी वापरात आणला जातो.


हा चमत्कार एका दिवसात घडलेला नाही. त्यासाठी २३ वर्षाचा कालावधी जावा लागला आहे. पंचायत प्रमुख आर. षण्मुखम सांगतात, १९९६ साली गावात विजेचे दरमहा बिल दोन हजार रुपये येत होते त्यानंतर गावात रस्ते झाले, विहिरी झाल्या पाणी पंप, रस्ते दिवे यामुळे बिल ५० हजारावर गेले. तेव्हा बायोगॅसवर वीज निर्मित होऊ शकते हे समजले आणि त्यांनी बडोदा येथे जाऊन त्याचे प्रशिक्षण घेतले. २००३ मध्ये पहिला प्लांट सुरु केला तेव्हा वीज बिल अर्धे झाले. मग २ गावात सौर रस्ते दिवे बसविले आणि कर्ज घेऊन पवनचक्की उभारली. राज्य शासनाच्या योजनेतून झोपड्यांच्या जागी पक्की घरे बांधून प्रत्येक घरावर सौर सयंत्रे बसविली. त्यातून आम्ही विजेबाबत स्वयंपूर्ण झालो आणि जास्तीची वीज विकून पैसे मिळवू लागलो.


आजही दिवसा सौर वीज आणि रात्री पवनचक्कीतून बनणारी वीज वापरली जाते. सर्वाना वीज मोफत आहे. पवनचक्कीसाठी घेतलेले कर्ज ७ वर्षात फेडले. आता आम्ही वर्षाला ७ लाख युनिट वीज बनवितो. आमची गरज ४.५ लाख युनिटची असून उरलेली वीज ३ रु. प्रतीयुनिट ने वीज मंडळाला विकतो. त्यातून १९ लाखाची कमाई होते आणि या पैशातून ११ गावाची विकास कामे केली जातात.

Leave a Comment