मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातात प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. खुर्जेकर यांचा मृत्यू


पुणे – पुण्यातील सुप्रसिद्ध अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. केतन खुर्जेकर यांचा यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर गहुंजे गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. डॉक्टरांचा चालक ज्ञानेश्वर भोसले यांचा देखील या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. डॉ. खुर्जेकर यांच्या गाडीला हा अपघात मागून येणाऱ्या लक्झरी बसने जोरदार धडक दिल्यामुळे कारच्या मागील भागाचा चक्काचूर झाला. इतर दोन डॉक्टर या अपघातात जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे डॉ. केतन खुर्जेकर यांचा आज वाढदिवस होता. पुण्यातील संचेती हॉस्पीटलमध्ये डॉ. खुर्जेकर हे आपली प्रॅक्टीस करत होते.

इतर जखमी झालेल्या डॉक्टरांची जयेश पवार आणि प्रमोद भिलारे अशी नावे आहेत. या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव आणि गहुंजे गावाजवळ काल रात्री १०.३० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

एका मेडिकल कॉन्फरन्समध्ये भाग घेण्यासाठी डॉ. खुर्जेकर मुंबईला आले होते. मुंबईहून परतत असताना तळेगाव जवळ त्यांची गाडी एमएच १४ जीयू ११५८ या गाडीचे टायर पंक्चर झाले. डॉ. खुर्जेकर आणि त्यांचा ड्रायव्हर ज्ञानेश्वर भोसले या कारचे पंक्चर काढत होते. त्याच वेळी भरधाव वेगात येणाऱ्या लक्झरीने रस्त्याच्या कडेला असलेल्या कारला मागून जोरदार धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

संचेती हॉस्पीटलचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. पराग संचेती यांनी याबाबत दिलेल्या श्रद्धांजलीत म्हटले की, डॉ. खुर्जेकर यांच्या आकस्मिक जाण्याने वैद्यकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. खुर्जेकर हे निष्णात अस्थीरोग तज्ज्ञ होते. ते संचेती हॉस्पिटलमध्ये अस्थीरोग विभागाचे प्रमुख होते. डॉ. खुर्जेकरांनी आतापर्यंत मणक्यांच्या ३५०० शस्त्रक्रिया केल्या होत्या. त्यांना एमएस ऑर्थोपेडिक्समध्ये गोल्डमेडल मिळाले होते.