२२ व्या विश्व विजेतेपदाला पंकज अडवाणीची गवसणी


नवी दिल्ली – आयबीएसएफ विश्व बिलियर्ड्स चॅम्पियनशिप स्पर्धेचे भारताचा आघाडीचा खेळाडू पंकज अडवाणीने विजेतेपद पटकावले आहे. त्याने म्यानमारच्या मंडाले येथे झालेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात नेय थ्वाय ओलाला ६-२ ने हरवत आपल्या कारकिर्दीतील २२ वे विश्व विजेतेपद नावावर केले.


पंकजचे हे बिलियर्ड्सच्या शॉर्ट फॉरमॅट प्रकारात सलग चौथे जेतेपद आहे. पंकजने मागील वर्षी अंतिम सामन्यातही नेय थ्वाय ओलाला पराभूत करत आपल्या नावावर सुवर्णपदक केले होते. पंकजने २०१४ नंतर झालेल्या प्रत्येक स्पर्धेत बिलियर्ड्स, स्नुकरमध्ये विजेतेपद पटकावले आहे. २००३ मध्ये पहिले जगज्जेतेपद पटकावल्यानंतर पंकजची विजयी घोडदौड सुरूच आहे. तो या खेळात सर्वाधिक जगज्जेतेपद पटकावणारा जगातील एकमेव स्नूकरपटू ठरला आहे.

विजेतेपद जिंकल्यानंतर पंकज म्हणाला, खरच, हे अविश्वसनीय आहे. जेतेपद लागोपाठ चार वर्ष पटकावणे आणि माझ्यासाठी मागच्या सहापैकी पाचवेळा जेतेपद जिंकणे हे खास आहे. जेव्हा विश्व बिलियर्ड्स चॅम्पियनशिप स्पर्धेत मी भाग घेतो तेव्हा एक गोष्ट असते की माझ्याकडे प्रेरणा खूप असते. माझ्यातील जिंकण्याची भूक आणि आग त्यामुळे अजूनही कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंकजच्या या विजेतपदावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तुझा संपूर्ण देशाला अभिमान असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

Leave a Comment