कोल्हापुरातील तरुणाचे पबजीमुळे बिघडले मानसिक संतुलन


कोल्हापूर: सध्याच्या तरुणाईला पबजी या गेमने अक्षरश: वेड लावले आहे. आजवर अनेक विचित्र घटना या खेळापायी घडल्याचे आपल्याला ऐकायला मिळत होते. त्यामुळेच या खेळावर मागील काही दिवसांपासून भारतात बंदी आणली जावी अशी मागणी केली जात आहे. पण तशी बंदी अद्याप तरी आलेली नाही. एकीकडे पबजीवर बंदीची मागणी सुरु असताना दुसरीकडे मात्र या गेमपासून तरुणाई अजिबात दूर जाण्यास तयार नाही. त्याचबरोबर या गेमच्या आहारी अनेक जण गेले असल्यामुळे भयंकर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातील एका कॉलेजवयीन मुलाची मानसिक स्थिती पबजी गेमच्या अति आहारी गेल्यामुळे ढासळली असल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.

कोल्हापूरमधील एक २० वर्षीय तरुणाची मानसिक स्थिती सातत्याने पबजी गेम खेळल्यामुळे ढासळल्याने त्याला चक्क रुग्णालयात दाखल करावे लागले. या तरुणाला कोल्हापूरमधील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याचे मानसिक संतुलन पूर्णपणे ढासळल्याचे दिसून आले होते. सध्या सोशल मीडियावर याच उपचारादरम्यानचा त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

यासंदर्भातील वृत्त न्यूज १८ लोकमत या वृत्तवाहिनीने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, पबजी गेममुळे कोल्हापूरमधील पन्हाळा येथील एक २० वर्षीय तरुण आपले मानसिक संतुलन बिघडवून बसला आहे. मागील काही दिवसांपासून हा कॉलेजवयीन तरुण सतत पबजी गेम खेळत असयाचा. त्याने गेल्या दोन-चार दिवसांपासून घरातील एका खोलीत स्वत:ला अक्षरश: कोंडून घेतले होते. तो त्याआधी गेम खेळण्याच्या नादात घरातील फार कुणाशी बोलायचा देखील नाही. पण शनिवारी संध्याकाळच्या दरम्यान तो अचानक प्रचंड आरडाओरडा करु लागला. ज्या पद्धतीने तो विचित्र वागत होता त्याच्या घरातील लोकांना ते पाहून प्रचंड भीती वाटली आणि त्यांनी त्याला तात्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी देखील त्याच्यावर तात्काळ उपचार सुरु केले. त्याचवेळी डॉक्टरांनी त्याच्याकडून मोबाइल काढून घेतला. आपला मोबाइल काढून घेतल्याचं लक्षात येताच तरुणाने रुग्णालयात प्रचंड आराडओरडा सुरु केला. यावेळी तरुण काहीसा हिंसक झाल्याचं दिसत होता. डॉक्टरांनी काही प्राथमिक उपचार केल्यानंतर तरुण आपल्या घरी निघून गेला. पण घरी गेल्यावर पुन्हा तो विचित्र वागू लागल्याचे त्याच्या घरच्यांनी सांगितल्यामुळे तरुणाच्या आई-वडिलांना आता आपल्या मुलाबाबत प्रचंड काळजी लागून राहिली आहे. त्यातच त्यांची आर्थिक परिस्थिती देखील बेताचीच आहे. फक्त शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबातील तरुण मुलाची अशी परिस्थिती झाल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.

दुसरीकडे, सीपीआर रुग्णालयातील डॉक्टरांनी याबाबत अशी माहिती दिली की, सतत मोबाइल गेम खेळत असल्याने त्याचा थेट परिणाम या तरुणावर झाला असल्यामुळे या तरुणावर वेळीच आणि योग्य ते उपचार केले जाणे गरजेचे असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment