
सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या ताफ्यावर सांगलीत कडकनाथ कोंबड्या फेकण्यात आल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चार ते पाच कार्यकर्त्यांनी इस्लामपूरच्या ताकारी-पलूस रोडवर हे आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांच्या यात्रेच्या रथापुढे येत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कोंबड्या आणि अंडी फेकली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन कडकनाथ कोंबडीपालन घोटाळाप्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी केले.
मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेसमोर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी फेकल्या कडकनाथ कोंबड्या
हातात अंडी आणि कोंबड्या या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी घेतल्या होत्या. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेचा रथ येताच अंडी फेकली आणि कोंबड्या हवेत भिरकावल्या. पण या आंदोलनात अंड्यांचे नुकसान झालेच, पण रथाखाली काही कोंबड्याही चिरडल्या गेल्या.
‘महारयत अॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ने कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दिले होते. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या राज्यभरातील शेतकऱ्यांची जवळपास 500 कोटींची फसवणूक झाली होती. यानंतर संचालक मंडळवर गुन्हाही दाखल झाला आहे. ही कंपनी सदाभाऊ खोत यांच्या नातेवाईकांची असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला होता. तर, हे आरोप खोत यांनी फेटाळून लावले आहेत.
