एसबीआयची १० हजार फुट उंचीवर दिस्कीत येथे शाखा


देशातील सर्वात मोठी बँक असा दर्जा मिळविलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने नव्याने केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्या गेलेल्या लडाखच्या दिस्कीत गावात नवी शाखा उघडून विक्रम केला आहे. एसबीआयची ही शाखा दिस्कीत या समुद्रसपाटीपासून १०,३१० फुट उंचीवर असलेल्या आणि ६ हजाराची लोकवस्ती असलेल्या ठिकाणी सुरु झाली आहे. भारत पाकिस्तान सीमेवरील तुर्तुक पासून हे अंतर ८० किमी आहे तर सियाचीन पासून १५० किमी आहे.


बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी नुब्रा खोऱ्यातील या शाखेचे उद्घाटन केले. ते म्हणाले स्टेट बँकेने लडाख विभागात १४ शाखा उघडलेल्या असून या भागाला आता केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्याने आणखी ५ शाखा उघडल्या जाणार आहेत. स्टेट बँकेने जम्मू काश्मीर, लडाख मध्ये स्टेट लेवल बँकर कमिटीची जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

जगातील सर्वाधिक उंचीवर प्रथम क्रमांकावर पेरू देशातील पुणो येथे बँक शाखा असून या ठिकाणाची समुद्रसपाटीपासून उंची १४३९३ फुट आहे. सर्वाधिक उंचीवरील एटीएमचे जागतिक रेकॉर्ड नॅशनल बँक ऑफ पाकिस्तानच्या नावावर आहे. हे एटीएम पाकचीन सीमेवर खूनजरेव दरीत समुद्रसपाटीपासून १५३९७ फुटांवर आहे. तर भारतात हा विक्रम युटीआय बँकेच्या नावावर आहे. या बँकेने सिक्किममधील नथूला पास जवळ थेगु येथे १३२०० फुट उंचीवर एटीएम बसविले आहे.

Leave a Comment