९/११ चा अजब योगायोग


अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याला १८ वर्षे पूर्ण होतानाचा ९/११ आकड्याचा एक अजब योगायोग घडून आला आहे. यंदा या दिवशी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जागेवर म्हणजे झिरो लेव्हलवर अनेक लोकांनी या घटनेची स्मृती जागी ठेवण्यासाठी प्रार्थना केली त्याचवेळी अमेरिकेत अनेक मुलांनी जन्म घेतला असेल पण विशेष चमत्कार घडला तो जर्मनटाऊन मधील मेथोडीस्ट लेबोनह्युअर हॉस्पिटलमध्ये. येथेही एक बालिका सिझेरियन पद्धतीने जन्माला आली मात्र तिची जन्मवेळ आणि वजन नोंदविताना डॉक्टरसह सर्व उपस्थित स्टाफ आश्चर्यचकित झाला.

या मुलीचे नामकरण अगोदरच क्रिस्टीना असे केले गेले होते. तिची जन्मतारीख ९/११ आहेच पण तिचे वजनही ९ पौंड ११ औंस म्हणजे साधारण साडेचार किलो भरले इतकेच नव्हे तर तिचा जन्म ९ वाजून ११ मिनिटांनी झाला असे लक्षात आले. मुलीची आई कॅमेरियान आणि वडील जस्टीन ब्राऊन यांना तर हा चमत्कार वाटतो आहे. वडील म्हणाले, १८ वर्षापूर्वी याच दिवशी देशात प्रचंड मोठी दुर्घटना घडली आणि आज याच दिवशी एक नवे जीवन सुरू झाले आहे. आमची कन्या मोठी झाली की तिच्या जन्मतारखेचे महत्व आम्ही तिला पटवून देऊ.

हॉस्पिटल मध्ये गेली ३५ वर्षे सेवा देत असलेल्या राशेल लॉफकिन म्हणाल्या, बाळ जन्माला येताना अनेक चमत्कार घडतात योगायोग घडतात पण माझ्या ३५ वर्षाच्या सेवेत हा चमत्कार प्रथमच मी पहिला. हा खरोखरच अजब योगायोग आहे.

Leave a Comment