पोलिसाला 24 तासांच्या ड्युटीमुळे मिळेना नवरी, नोकरीला मारली लाथ

हैद्राबाद येथील चारमिनार पोलिस स्टेशनमधील 29 वर्षीय कॉन्स्टेबल सिद्दांथी प्रतापने राजीनामा दिला आहे. या पोलिसांने राजीनाम्यासाठी दिलेले कारण सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. कामाचा कालावधी अधिक असल्यामुळे मुलीने लग्नासाठी सिद्दांथी प्रतापला नकार दिला आहे. कमिश्नरला लिहिलेल्या पत्रात त्याने राजीनाम्याचे कारण 24 तासांची नोकरी, आठवड्याला एकही सुट्टी नाही आणि केवळ नावापुरते प्रमोशन हे सांगितले आहे.

पत्रामध्ये सिद्दांथीने लिहिले आहे की, पोलिसमध्ये नोकरी करणे अवघड आहे हे सर्वांनाच माहिती आहे. इंजिनिअरिंगच्या ग्रेज्युएशननंतर 2014 मध्ये मी पोलिसात भरती झालो. पाच वर्षात मला एकही प्रमोशन मिळाले नाही. मी बघितले की, केवळ एसआय, एएसआयच्या वरील रँक असणाऱ्या अधिकाऱ्यांनाच लवकर प्रमोशन मिळते व दुसऱ्या सुविधा मिळतात. कॉन्स्टेबल म्हणून नोकरी ज्वाइन करणारे 30-40 वर्षानंतरही त्याच पोस्टवर राहून निवृत्त होतात. या कारणामुळे मी नोकरी करू इच्छित नाही.

सिद्दांथी यांनी सांगितले की, अनेक माजी अधिकारी सांगतात की, सरकार कॉन्स्टेबलच्या पगारात आणि भत्त्यात वाढ करणार आहे. याचबरोबर 24 तासांची नोकरी आणि एकही साप्ताहिक सुट्टी नाही. सणांना देखील सुट्टी नाही. ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्यांना देखील अधिकवेळ काम करण्यास सांगितले जाते.

Leave a Comment