एनकाऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा अखेर शिवसेनेत


मुंबई – काल शुक्रवारी पोलीस खात्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले एनकाऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

शर्मा यांनी आरपीआयनंतर शिवसेनेत येऊन आपल्या राजकीय करिअरला पुन्हा नवीन सुरुवात केली आहे. नालासोपारा येथील अनेक कार्यकर्त्यांनी शर्मा यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश केला. नालासोपारा विधानसभा क्षेत्रातून शर्मा हे निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा सुरू आहे.

मुंबई पोलीस दलातील प्रदीप शर्मा हे एक पोलीस निरीक्षक होते. ते एनकाऊंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध होते. 1983 मध्ये पोलीस दलात दाखल झालेले शर्मा यांची कारकीर्द नेहमीच वादात राहिली. 1990च्या दशकात जेव्हा गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमाण वाढले होते, तेव्हा शर्मा यांनी अनेक गुन्हेगारांचे एन्काऊंटर केले.

जवळपास 312 चकमकींमध्ये शर्मा यांचा सहभाग होता. आजवर त्यांनी शंभरहून अधिक गुंडांचा एन्काऊंटरमध्ये खात्मा केला आहे. त्यात लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसह आंतरराष्ट्रीय गुन्हेविश्वातील गुंडांचा देखील समावेश आहे. प्रदीप शर्मा यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसाठी काम करत असल्याचा आरोप होता. लखनभैया बनावट चकमक प्रकरणी त्यांच्यावर 2008 साली निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

नोव्हेंबर 2006 मधील लखनभैया चकमक बनावट असल्याचे तपासात समोर आल्यानंतर मुंबई पोलीस दलातील 13 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यात शर्माही होते. 2013 मध्ये मुंबईतील न्यायालयाने त्यांना आरोपमुक्त केले.

9 वर्षांनी, 24 ऑगस्ट 2017 रोजी शर्मा यांचे निलंबन संपले आणि त्यांना त्याच दिवशी ठाणे गुन्हे शाखेतील खंडणीविरोधी पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्त केले. मात्र, त्यानंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट शर्मा यांनी 4 जुलै 2019 रोजी तडकाफडकी राजीनामा दिला. अशा या शर्मांनी आता राजकारणात एन्ट्री घेतली आहे. ते शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पोलीस खात्यात आपली चकमक दाखवल्यानंतर शर्मा राजकारणात किती चमकतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment