पुन्हा देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होणार – सोमय्या


ठाणे – पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचे काम माजी खासदार आणि भाजपचे ठाणे लोकसभा प्रभारी किरीट सोमय्या यांनी केले आहे. एकीकडे आदित्य ठाकरे यांचे नाव शिवसेना मुख्यमंत्री म्हणून पुढे करीत आहे. तर दुसरीकडे युतीचेच सरकार येणार असून , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार, असल्याचे भाकीत किरीट सोमय्या यांनी केले आहे.

15 सप्टेंबरला भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांचा ठाणे दौरा असून गडकरी रंगायतन येथे काश्मीरचे 370 आणि 35 अ कलम या विषयावर भाजप कार्यकर्ते तसेच नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत, या विषयी माहिती देण्यासाठी भाजप शहराध्यक्ष ऍड संदीप लेले, आमंदार संजय केळकर, गटनेते नारायण पवार यांनी पत्रकार परिषद खोपट येथील भाजप कार्यालयात आयोजित केली होती. किरीट सोमय्या यांनी यावेळी माध्यमांसोबत संवाद साधला.

निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून अद्याप युतीच्या जागा संदर्भात चर्चा सुरू आहे. लोकसभाप्रमाणेच विधानसभेला सेना भाजप एकत्र लढण्याची तयारी करत आहेत. पण या सर्व प्रक्रियेत मुख्यमंत्री पद हा मुद्दा कळीचा बनत चालला आहे. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा देवेंद्र फडणवीस हेच होणार, असे भाकीत करत किरीट सोमय्या यांनी सेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

कोणत्या पक्षाला जागा वाटपामध्ये किती जागा मिळणार याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नसले तरीही युती होणार असल्याचे दावे दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून केले जात आहेत. अशाच प्रकारचा दावा आता भाजपचे ठाणे जिल्हा प्रभारी आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाण्यात केला. त्या वेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापुर्वीच भाजप आणि शिवसेनेची युती होणार असल्याचे स्पष्ट केले असून फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या दाव्याच्या माध्यमातून त्यांनी शिवसेनेला अप्रत्यक्षपणे डिवचल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Leave a Comment