दिलेला शब्द पाळत आनंद महिंद्रांनी बंद केला प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी जुलैमध्ये प्लास्टिकचा वापर करणे बंद करणार असल्याचे म्हटले होते. अखेर आनंद महिंद्रा यांनी आपला शब्द पाळत कॉर्पोरेट बोर्डरूममध्ये प्लास्टिक बाटल्यांच्या ऐवजी स्टिलच्या बाटल्यांचा वापर करणार असल्याचे सांगितले आहे. मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरवर आनंद महिंद्रा यांनी याबाबतची माहिती दिली.

आनंद महिंद्रा यांनी स्टिलच्या बाटल्यांचा फोटो शेअर करत लिहिले की, आता कंपनीच्या मिटिंगमध्ये प्लास्टिक बाटल्यांच्या ऐवजी स्टीलच्या बाटल्यांचा वापर केला जाईल. यासाठी आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या टीमचे देखील आभार मानले.

आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटला 30 हजारांपेक्षा अधिक लाईक्स आले असून, शेकडो युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत. प्लास्टिकच्या विरोधात आनंद महिंद्रा यांनी उचललेले पाऊल युजर्संना खूपच आवडले.

काही युजर्सनी त्यांनी शब्द पाळल्याचे म्हटले, तर काहींनी एक चांगली सुरूवात केली म्हणत त्यांची प्रशंसा केली.

आनंद महिंद्रा यांनी जुलै महिन्यात ट्विट करत प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर बंद करणार असल्याचे म्हटले होते. तसेच, प्लास्टिकच्या वापरावर बंदीसाठी केंद्र सरकार देखील पाऊले उचलत असून, लवकरच 12 प्लास्टिकच्या वस्तूंवर सरकार बंदी घालण्याची शक्यता आहे.

Leave a Comment