कॅनेडीयन नागरिकाने दिल्लीत इमीग्रेशन अधिकाऱ्याला केली मारहाण, विमानतळावरूनच पाठवले परत

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका कॅनेडीयन नागरिकाने इमीग्रेशन अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. कागदपत्रांच्या तपासणी वेळी अधिकाऱ्याबरोबर बाचाबाची झाले व त्यांचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेनंतर आधिकाऱ्यांनी युवकाला विमानतळावरूनच परत पाठवून दिले.

कॅनेडीयन नागरिक लुफ्थांसा एअरलाईन्सने 11 सप्टेंबरला रात्री म्यूनिचवरून दिल्ली विमातळावर आला होता. नियमांनुसार कोणत्याही परदेशी नागरिकाला विमानतळावरून बाहेर येण्याआधी इमीग्रेशन डिपार्टमेंटकडून तपासणी करून घेणे गरजेचे असते.

तपासणी दरम्यान कॅनेडीयन युवक कागदपत्रे दाखवू शकला नाही व इमीग्रेशन फॉर्म व्यवस्थित भरू शकला नाही. यावर अधिकाऱ्याने त्याला तुला नियमांची माहिती नाही का असे विचारले. यावर युवक भडकला व त्याने अधिकाऱ्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. यानंतर अधिकाऱ्यानी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करत त्याला पुन्हा कॅनेडाला पाठवून दिले.

अशाच प्रकारची घटना गुरूवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्मिनल 3 वर देखील घडली. दुबईवरून आलेल्या नागरिकाने इमीग्रेशन अधिकाऱ्याबरोबर वाद घातला. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

Leave a Comment