सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राचा दिलासा


जम्मू काश्मीर मध्ये सध्या सफरचंदाचा हंगाम सुरु असून काश्मिरी सफरचंदाची चव आणि स्वाद आगळा असतो. पण यंदा या राज्यासाठी लागू असलेले ३७० कलम रद्द झाल्याने येथील शेतकरी अडचणीत आले होते. केंद्रसरकारने घेतलेल्या आणि अमलात आणलेल्या एका निर्णयाने आता सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी दूर केल्या असून त्यांना त्यांच्या मालाची थेट विक्री सरकारला करता येणार आहे. सरकार शेतकऱ्यांना चांगला मोबदला देऊन त्यांचा माल खरेदी करत असून त्याची किंमत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.


गुरुवारी या संदर्भात जम्मू काश्मीरचे राज्यपाल सतपाल मलिक यांनी सफरचंदासाठी लागू केलेल्या मार्केट इंटरव्हेंशन स्कीमचे उद्घाटन केले असून या योजनेतून सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांना २ हजार कोटी रुपयांची मिळकत होईल असा अंदाज आहे. गतवर्षी येथे सफरचंदाचे २० लाख टन उत्पादन झाले होते. कलम ३७० रद्द झाल्याने निर्माण झालेल्या अडचणीमुळे शेतकऱ्यांना सफरचंद निर्यातीत अडचण येत होती तसेच दहशतवाद्यांनी शेतकऱ्यांना मंडीपासून दूर राहण्याचे फर्मान बजावले होते.

त्यावर केंद्र सरकारने ही तोड काढली असून त्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे तसेच शेतकरी दलालाच्या मध्यस्तीशिवाय त्यांचा माल थेट विकू शकणार आहेत. यंदा प्रथमच उत्पादनाच्या ६० टक्के माल शेतकऱ्यांकडून थेट खरेदी केला जाणार असून त्यासाठी सरकारने नाफेडची नोडल एजन्सी म्हणून नेमणूक केली आहे. श्रीनगर, सोपोर, शोपिया मंडीतून ही खरेदी केली जात आहे. यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करून त्यांचे आधार कार्ड आणि बँक नंबरची माहिती द्यायची आहे. खरेदी केलेल्या मालाचे पैसे त्यांच्या बँकेत ४८ तासात जमा केले जात असल्याचे समजते.

Leave a Comment