वैष्णोदेवी मंदिरासाठी बनतेय सुवर्णद्वार


केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातूनही मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या वैष्णोदेवी भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने माता दी च्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांचे स्वागत वैष्णोदेवी गुहेला बसविण्यात येत असलेले सुवर्णद्वार करणार आहे. या प्राचीन गुहेला सोन्याचे भव्य दार बसविले जात असून हे द्वार तयार करण्याचे काम वेगाने सुरु आहे. वैष्णोदेवी श्राईन बोर्ड हे काम करत असून अनेक वर्षांचे भाविकांचे स्वप्न त्यामुळे प्रत्यक्षात येत असल्याचे बोर्ड अधिकारी म्हणाले.


या सुवर्णद्वारावर विविध देवदेवतांची चित्रे कोरली गेली असून घुमट, सोन्याचे तीन झेंडे, छत्री आहे. वैष्णोदेवीची नऊ रूपे त्यावर प्रतिमास्वरुपात आहेत. दाराच्या उजवीकडे ६ फुट उंचीची महालक्ष्मी प्रतिमा आहे तर डावीकडे देवीची आरती कोरली गेली आहे. द्वाराच्या मध्ये २५ किलोची सोनेचांदीतून घडविलेली घंटा आहे. प्रवेशद्वाराच्या आत ब्रह्मा विष्णू, महेश आणि सूर्य यांच्या प्रतिमा असून प्रवेशद्वाराच्या वर गणेश आणि हनुमान प्रतिमा आहे. दार मजबूत व्हावे म्हणून १० किलो सोन्यात १ टन तांबे आणि चांदी घातली गेली आहे. वैष्णोदेवी भवनात २० कुशल कारागीर या द्वाराची घडणी करत आहेत.

Leave a Comment