पाऊस थांबवा म्हणून बेडकांचा घटस्फोट


मेरा भारत महान आणि ये मेरा इंडिया असे आपण अभिमानाने म्हणतो त्यामागे अनेक कारणे आहेत. विविधता आणि त्यातून एकता दर्शविणाऱ्या आपल्या देशात अनेक तऱ्हेच्या चालीरीती आजही पाळल्या जातात. पावसाने दीर्घ काळ दडी मारली तर आपल्याकडे बेडकाचा विधिवत विवाह केला जातो. त्यामुळे पाऊस पडतो असे सांगतात. यंदा मध्यप्रदेशात अगोदर पाउस नाही म्हणून बेडकांचे लग्न लावले गेले पण आता इतका पाऊस पडतोय की तो थांबवा म्हणून बेडकांचा २ महिन्यातच विधिवत घटस्फोट घडवून आणण्याची पाळी ओढविली.


मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशात यंदा मान्सून खुपच उशिरा आला. राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने दोन महिन्यापूर्वी ओम शिवसेना शक्ती मंडळाने बेडकांचा शास्त्रोक्त विवाह लावला. पावसाची देवता इंद्र प्रसन्न व्हावा म्हणून हा विधी केला गेला. पण त्यामुळे इंद्र इतका प्रसन्न झाला की आता पाऊस थांबण्याचे नाव घेत नही. त्यामुळे राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यंदा पावसाने गेल्या १३ वर्षाचा विक्रम मोडला आहे. बुधवारपर्यंत राज्यात सरासरीच्या २६ टक्के जादा पाऊस झाला असून तो थांबवा म्हणून याच मंडळाने इंद्रपुरी मंदिरात मंत्रोच्चारात बेडकांचा घटस्फोट घडवून आणला. एकच गोची झाली ती म्हणजे, ज्या बेडकांचे लग्न लावले ते कुठे आहेत हे माहिती नसल्याने त्याच्या प्रतिकृती बनवून घटस्फोट केला गेला.

पावसाचा जोर कायम राहिल्याने भोपालच्या सखल भागात पाणी साचले असून २०१६ नंतर प्रथमच कोलार धरणाचे दरवाजे उघडले गेले आहेत. पावसाचा जोर १५ सप्टेंबर नंतर कमी होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

Leave a Comment