सीटबेल्ट लावून बाप्पा गेले विसर्जनाला


गणपती बाप्पाना निरोप देण्याची घडी म्हणजे अनंतचतुर्दशी. गणेशचतुर्थीच्या दिवशी वाजत गाजत घरी आलेल्या पाहुण्या गणपती बाप्पाना १० दिवसांच्या मुक्कामानंतर पूजाअर्चा, हारफुले आणि दहीभाताची शिदोरी देऊन त्यांची बोळवण केली जाते तो हा दिवस. देशभर जागोजागी गणेश विसर्जनाच्या मिरवणुका काढल्या गेल्या आहेत. मध्यप्रदेशातील मंद्सोर येथे विसर्जनासाठी नेल्या जात असलेल्या बाप्पाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

देशात १ सप्टेंबरपासून नवीन मोटार नियम कायदा लागू झाला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना जबरदस्त दंड ठोठावला जात आहे. त्यामुळे एकूणच सर्व जनता वाहतूक नियमांबद्दल अधिक जागरूक झाली आहे. वाहतूक पोलीससुद्धा त्यातून सुटलेले नाहीत. मंद्सोर येथे एक वाहतूक पोलीस त्याच्या गाडीतून बाप्पाला विसर्जनासाठी नेताना दिसत आहे. विशेष म्हणजे या पोलीसासोबत कारच्या फ्रंटसीटवर बसलेले बाप्पा चक्क सीटबेल्ट लावून बसले आहेत. वाहतूक नियम पाळा, दंड टाळा असा संदेश यातून दिला गेला आहे.

बाप्पाच्या आगमनाचे जसे महत्व आहे तसेच विसर्जनाचेही आहे. हे दोन्ही कार्यक्रम कोणत्याही अनिष्ट घटनेने झाकोळून जावू नयेत म्हणून वाहन चालविताना काळजी घ्या, वाहतूक नियम पाळा असा संदेश जणू हे बाप्पा देत आहेत.

Leave a Comment