जॅक मा यांचा रॉकस्टार अवतार


चीनी अलीबाबाचे संस्थापक जॅक मा यांनी मंगळवारी त्यांची निवृत्ती जाहीर केली आणि या दिवशी झालेल्या कार्यक्रमात ते चक्क पॉप रॉकस्टारच्या अवतारात मंचावर आले. ८० हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या स्टेडियम मध्ये झालेल्या या कार्यक्रमाची तारीख जाणूनबुजून १० सप्टेंबर ठेवली होती. याच दिवशी जॅक मा यांचा जन्म झाला, याच दिवशी त्यांनी अलीबाबाची स्थापना केली आणि चीनमध्ये हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. जॅक मा ५५ वर्षाचे आहेत तर अलिबाबाला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. चीनच्या हेन्ग्झू येथे हा कार्यक्रम पार पडला

जॅक मा यांनी त्यांच्या परफॉर्मन्ससाठी खास लुक केला होता. हातात गिटार आणि डोक्यावर रॉकस्टारचा विग घालून जॅक मंचावर आले आणि आपल्या कर्मचारीवर्गाशी संवाद साधताना भावूक झाले. कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासाठी गाणे म्हटले तेव्हा जॅक यांनी आता माझे नवे आयुष्य सुरु होत आहे अशी भावना व्यक्त केली. जॅक उर्वरीत आयुष्य शिकविण्यात आणि समाजकार्यात व्यतीत करणार आहेत.


अलीबाबाची स्थापना करण्यापूर्वी ते इंग्रजी विषयाचे शिक्षक होते. होवर्ड मधून ते १० वेळा रिजेक्ट केले गेले होते तसेच पदवी मिळविल्यावर नोकरी मिळविताना त्यांना ३० फर्मकडून नकार ऐकावा लागला होता. १९९९ मध्ये त्यांनी अलीबाबाची सुरवात केली आणि आज या कंपनीची नेटवर्थ ३ लाख कोटींची आहे. जॅक जगातील सर्वाधिक ५०० श्रीमंत लोकांच्या यादीत २० व्या स्थानावर असून त्यांनी शिक्षणासाठी ४.५ कोटी डॉलर्स दान करत असल्याची घोषणा केली आहे.

Leave a Comment