सप्टेंबरमध्ये देशभर लागू करण्यात आलेल्या नवीन वाहन नियम कायद्याची अंमलबजावणी वाहतूक पोलिसांकडून कठोरपणे केली जात असल्याचे दृश्य दिसत असून रोज दंड म्हणून आकारल्या गेलेल्या प्रचंड रकमांवरून सोशल मीडियावर लोक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काही राज्यांनी दंड कमी करावा अशी विनंती रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना केली असताना प. बंगालच्या मुख्यमंत्री ममतादीदी यांनी हा नियम राज्यात चोलबे ना असे सांगून तो लागूच केलेला नही.
वाहन नियम मोडला, भगवान रामानी १.४१ लाख दंड भरला
अश्या परिस्थितीत राजस्थान मधून दिल्लीकडे वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला ओव्हरलोडिंग मुळे चक्क १ लाख ४१ हजार रुपयांचा दंड ठोठावला गेला असून ट्रक मालकाने हा दंड दिल्लीच्या रोहिणी कोर्टात ९ सप्टेंबरला भरला देखील आहे. वाहन नियम मोडला म्हणून चक्क भगवान रामाने दंड भरला अशी बातमी व्हायरल झाली आहे कारण या ट्रक मालकाचे नाव भगवान राम आहे. विशेष म्हणजे हा दंड दिल्ली वाहतूक पोलिसांनी नाही तर स्टेट ट्रान्सपोर्ट अॅथॉरीटीने आकाराला असून त्याची पावती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
चलनावरचे भगवान राम हे नाव स्पष्ट दिसते आहे. हा ट्रक ५ सप्टेंबरला राजस्थानातून माल घेऊन दिल्लीकडे रवाना झाला आणि दिल्ली एनसीआर मध्ये ट्रक ओव्हरलोड केल्याचे सांगून दंड केला गेला असे समजते. नवीन वाहन नियम लागू झाल्यापासून आकाराला गेलेला हा सर्वाधिक दंड ठरला आहे.