इडलीवाल्या आजीच्या व्यवसायात महिंद्र गुंतवणूक करण्यास उत्सुक


बिझिनेस जगतात प्रसिद्ध आनंद महिंद्र त्यांच्या ट्विटस मुळेही खूप चर्चेत असतात. महिंद्र कुठे गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत यावर अनेकांचे लक्ष असते. आनंद महिंद्र यांनी ट्विटरवरून नुकतीच एका व्यवसायात गुंतवणूक करण्याशी मनीषा व्यक्त केली आहे. आनंद महिंद्र यांना तामिळनाडूतील एका ८० वर्षीय आजीच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याची इच्छा आहे. कमलाथल नावाच्या या आजीबाई गेली अनेक वर्षे १ रुपयात इडली, चटणी आणि सांबार देऊन अनेक गरीब लोकांची भूक भागवत आहेत. रोज १ हजार इडल्या करून त्यांना त्यातून फक्त २०० रुपये मिळतात. त्याचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मिडियावर शेअर केला गेला आहे. तो पाहून आनंद महिंद्र यांनी वरील इच्छा व्यक्त केली आहे.


८० वर्षाची ही आजी रोज पहाटे तिच्या शेतातून ताज्या भाज्या घेऊन येते. इडलीचे पीठ ती दगडी रगडयावर स्वतः वाटते आणि लाकडाच्या चुलीवर सकाळ पासून तिचा इडली बनविण्याचा उद्योग सुरु होतो. आसपासच्या भागातूनच नाही तर बाजूच्या गावातून सुद्धा लोक आजीची इडली खाण्यासाठी गर्दी करतात. काही वर्षापूर्वी ती ५० पैशात विकत असे आता हा दर १ रुपया झाला आहे. आजी सांगते लोक मला इडलीचा दर वाढव असे सांगतात पण मी पैशासाठी हे करत नाही. माझ्याकडे येणारा बहुतेक ग्राहक गरीब आहे, त्याला पोटभर खायला मिळावे म्हणून मी हे करते.

कोईमतूर पासून २० किमीवर असलेल्या पेरूर गावाजवळ वडिवेल्ल्मपलासम या गावात आजीचा ह उद्योग आहे. तिची या परिसरात इडली दादी अशीच ओळख आहे. गेली ३० वर्षे आजी हा उद्योग करते आहे. तिची माहिती वाचून आनंद महिंद्रा यांनी तिला एलपीजी शेगडी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि तिच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याची तयारी दाखविली आहे.

Leave a Comment