सर्वोच्च न्यायालयात होणार किशोरवयीन मुस्लिम मुलींच्या विवाह संदर्भात सुनावणी

16 वर्षीय मुस्लिम मुलीने आपला विवाह वैध असल्याचे म्हणत सर्वाच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वाच्च न्यायालय या मुलीच्या याचिकेवर सुनावणी करण्यास तयार झाले आहे.

2018 मध्ये अलाहाबाद कोर्टाने या मुलीचा विवाह अमान्य ठरवत तिला अयोध्येतील शेल्टर होममध्ये पाठवण्याचा आदेश योग्य असल्याचे म्हटले होते. आता या निर्णयाच्या विरोधात मुलीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

भारतातील 1954 च्या विवाह कायद्यानुसार, मुलांसाठी लग्नाचे वय हे 21 वर्ष तर मुलींसाठी 18 वर्ष निश्चित करण्यात आलेले आहे. 2006 च्या बालविवाह कायद्यानुसार, बालविवाह करणे गुन्हा आहे. मात्र शाफिन जहान प्रकरणात कोर्टाने म्हटले होते की, मुस्लिम धर्मानुसार, दोघेही जण वयात आले असतील तर लग्न वैध ठरवले जाईल.

यांसदर्भात न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकार आणि अन्य लोकांना नोटिस पाठवत उत्तर देण्यास सांगितले आहे. या मुलीचे वकील दुष्यंत पराशरने न्यायालयात म्हटले आहे की, 16 वर्षीय मुलीने 24 वर्षीय व्यक्तीबरोबर स्वतःच्या संमतीने विवाह केला असून, इस्लामनुसार मुलगी वयात आल्यावर तिचे लग्न करता येते. त्यामुळे हा विवाह वैध आहे.

मुलीच्या वडिलांनी तक्रार केली आहे की, त्यांच्या अल्पवयीन मुलीला त्या मुलाने किडनॅप केले आहे. मात्र मुलीने न्यायाधीशांसमोर स्वतःच्या मर्जीने तिने हा विवाह केला असल्याचे मान्य केले आहे व तिला तिच्या पतीबरोबर राहायचे आहे.

बहरीच येथील न्यायालयाने  मुलगी अल्पवयीन असून, ती अठरा वर्षांची होईपर्यंत तिला शेल्टर होममध्ये ठेवण्यात यावे व लग्न अवैध असल्याचा निर्णय दिला होता. यानंतर मुलीच्या नवऱ्याने अलाहाबाद न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्यांनी देखील बहरीच येथील न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत तिला 18 वर्षांची होईपर्यंत शेल्टर होममध्ये ठेवण्यात यावे असे म्हटले होते. याच विरोधात आता तरूणीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Leave a Comment