उर्मिला मांतोडकर – बिलंदरांच्या घेऱ्यातील आणखी एक तारका!

आपल्या देशात क्रिकेट आणि चित्रपट हे दोन धर्म मानले जातात. साहजिकच क्रिकेटपटू आणि चित्रपट तारे-तारकांना अफाट लोकप्रियता मिळते. या लोकप्रियतेचा फायदा उचलण्यासाठी त्यांना राजकारणात आणले जाते. मात्र राजकारण हा एक वेगळाच प्रांत आहे. त्यात तगून उरणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नाही. म्हणूनच राजेश खन्नापासून रिना रॉयपर्यंत अनेक नट-नट्यांनी राजकारणात हात पोळून घेतले. त्यात ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकरांची भर पडली आहे.

उत्तर मुंबईमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या अभिनेत्री उर्मिला मांतोडकरने अखेर पक्षाचा राजीमाना दिला आहे. पक्षातील अंतर्गत कुरबुरीला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचे तिने म्हटले आहे. तसेच पक्षातील गटबाजीलाही दोष दिला आहे. ऐन राज्य विधानसभेच्या निवडणुकीआधी हा राजीनामा आल्यामुळे त्याचा असर होईल, असे मानले जाते.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार म्हणून उर्मिलाने राजकारणात सुरूवात केली होती. भारतीय जनता पक्षाचे गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात तिला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र केवळ पाच महिन्यांच्या आपल्या राजकीय कारकीर्दीला तिने रामराम केला आहे.

यापूर्वीही तिने मिलिंद देवरांना पत्र लिहून पक्षातीलच काही लोकांनी मला पराभूत करण्यासाठी काम केले, असा आरोप केला होता. मात्र त्या पत्रावर काहीही कारवाई झाली नसल्याची तक्रार तिने राजीनाम्याच्या पत्रात केली आहे. इतकेच नाही तर पक्ष प्रमुखाला लिहिलेले पत्र माध्यमांपर्यंत कसे पोचले, असा प्रश्नही विचारला आहे. गंमत म्हणजे खुद्द मिलिंद देवरांनी गेल्या आठवड्यातच पदाचा राजीनामा दिला आहे.

अशा रीतीने सत्तेच्या खेळात अयशस्वी ठरलेल्या तारकांमध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे. खुद्द महानायक अमिताभ बच्चन यांचेच नाव अशा ताऱ्यांमध्ये अग्रभागी आहे. अमिताभ बच्चन आणि डांसिंग स्टार गोविंदा यांनी राजकारणात धडाकेबाज प्रवेश केला होता. दोघांनीही प्रचंड बहुमतांनी विजय मिळवला आणि आपापल्या दिग्गज प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली. बच्चन यांनी हेमवतीनंदन बहुगुणा आणि गोविंदाने राम नाईक यांचा पराभव केला. मात्र त्यानंतर त्यांची राजकारणात डाळ शिजली नाही. बोफोर्स गैरव्यवहारात नाव आल्यानंतर बच्चन यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि पुन्हा राजकारणाकडे वळूनही पाहिले नाही. गोविंदानेही कसेबसे पाच वर्षे काढून 2008 मध्ये पुन्हा अभिनयावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला.

अगदी तसेच रूपेरी पडद्यावरील खलनायक परेश रावल यांनीही हा आपला मार्ग नाही, हे वेळीच ओळखले. त्यांनी 2014 मध्ये गुजरातमधून लोकसभेत प्रवेश केला, मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांनी आपण भाग घेणार नाही, हे आधीच सांगून टाकले.

असेच आणखी एक प्रसिद्ध नाव म्हणजे नितीश भारद्वाज. बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका करून नितीश यांना खूप लोकप्रियता मिळाली. या लोकप्रियतेचा लाभ उठवण्यासाठी भाजपने त्यांना आपलेसे केले आणि 1996 मध्ये ते खासदारही झाले. परंतु केवळ तीन वर्षांनी 1999 मध्ये ते निवडणुकीत पराभूत झाले आणि त्यानंतर नितीश भारद्वाज कधीही राजकीय व्यासपीठावर दिसले नाहीत.

महाभारताप्रमाणेच रामायण मालिकेतील ‘रावण’ अरविंद त्रिवेदी आणि ‘सीता’ दीपिका चिखलिया यांनीही लोकप्रियतेचा लाभ घेत संसदेत प्रवेश केला होता. हे दोघेही भाजपचे खासदार बनले. त्रिवेदी हे 1991 मध्ये गुजरातमधील साबरकांठा येथून खासदार बनले आणि दीपिकानेही 1991 मध्ये वडोदरातून विजय मिळवला. परंतु त्यानंतर त्यांना पुन्हा कधीही वाव मिळाला नाही.

काँग्रेसचे खासदार सुनील दत्त यांनी अभिनय क्षेत्रातून येऊन राजकारणातही यश मिळवले. त्यांची कन्या प्रिया दत्त यांनीही राजकारणात कारकीर्द केली. मात्र सुनील दत्त यांचा मुलगा असलेल्या संजय दत्तला ती किमया जमली नाही. संजयने 2009 मध्ये समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. त्याने लखनऊतून निवडणूक लढवण्याचा निर्णयही केला होता, मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या मनसुब्यांवर पाणी फेरले होते. न्यायालयाने संजय दत्तचे नामांकन रद्द केले होते आणि त्याला समाजवादी पक्षाचा स्टार प्रचारक म्हणूनच भूमिका पार पाडावी लागली होती. त्यानंतर संजय दत्तने सक्रिय राजकारणाला टाटा केला होता आणि आता तो केवळ बहिणी प्रिया दत्तचा प्रचार करतो. आता तो राष्ट्रीय समाज पक्षात येत आहे, अशी चर्चा आहे.

उर्मिला मातोंडकरच्या रूपाने या सर्व इतिहासाला उजळणी मिळाली आहे. राजकारण हे बिलंदरांचे क्षेत्र आहे. तेथे पाहिजे जातीचे, अशाच व्यक्तींचा तेथे टिकाव लागतो. केवळ प्रसिद्धी आहे किंवा मनात काम करण्याची तळमळ आहे, म्हणून तेथे निभाव लागत नाही. जो या बिलंदरांचा घेरा तोडू शकतो, तोच येथे टिकू शकतो.

Leave a Comment