प्रतीक्षा संपली, अ‍ॅपलकडून नवीन आयफोन लाँच

अ‍ॅपल कंपनीने गेली अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेली आयफोन 11 सिरीज अखेर लाँच केली आहे. कॅलिफोर्नियातील स्टीव्ह जॉब्स थेअटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इव्हेंटमध्ये हे फोन लाँच करण्यात आले आहेत. या सीरिजमध्ये आयफोन 11, आयफोन 11 प्रो आणि आयफोन 11 मॅक्स हे फोन लाँच करण्यात आले आहे.

आयफोन 11 मध्ये ड्युल कॅमेरा असून, यामध्ये कंपनीचे सर्वात फास्ट प्रोसेसर ए-13 देखील देण्यात आलेले आहे. याचबरोबर कंपनीने दावा केला आहे की, यामध्ये आतापर्यंतचा सर्वात जलद मोबाईल जीपीयू देखील आहे. कंपनीने या फोनची किंमत 699 डॉलर ठेवली आहे. हा फोन 64 जीबी, 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेज अशा तिन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. भारतात याची किंमत 64,900 रूपयांपासून सुरू आहे.

आयफोन 11 मध्ये 6.1 इंच लिक्विड रेटिना डिस्प्ले असून, हा 6 वेगवेगळ्या रंगामध्ये उपलब्ध आहे. फोनमधील दोन्ही कॅमेरे 12 मेगापिक्सल आहेत. आयफोन 11 ला आयपी68 रेटिंग मिळाली असून, याचाच अर्थ फोन वॉटर प्रुफ आणि डस्ट रेसिस्टेंट आहे.

कंपनीने याचबरोबर आयफोन 11 प्रो आणि आयफोन 11 प्रो मॅक्स देखील लाँच केले आहेत. यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ट्रिपल रिअर कॅमेरा असणारा कंपनीचा हा पहिलाच फोन आहे.  आयफोन 11 प्रो मध्ये 5.8 इंच स्क्रीन आहे तर आयफोन 11 प्रो मॅक्समध्ये 6.5 इंच स्क्रीन आहे. यांच्या डिस्प्लेचे नाव सुपर रेटिना आहे. ट्रिपल रिअर कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यामध्ये 12 मेगापिक्सल वाइड अँगल कॅमेरा, 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड कॅमेरा  आणि एक टेलीफोटो कॅमेरा देखील आहे. आयफोन प्रो सिरीजमधील फोन 18 वॉट फास्ट चार्जर बरोबर येतील.

हे फोन देखील 64 GB, 128 GB आणि 256 जीबी व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असतील. आयफोन 11 प्रो ची किंमत 999 डॉलर पासून सुरू होईल. तर आयफोन 11 मॅक्सची किंमत 1099 डॉलर पासून सुरू होईल. भारतात या फोनची क्रमशः किंमत 99,900 रूपये आणि 1,09,900 रूपयांपासून सुरू होईल.

सर्व नवीन मॉडेल 13 सप्टेंबरपासून प्री ऑर्डर करता येतील व 20 सप्टेंबरपासून हे फोन ग्राहकांना मिळण्यास सुरूवात होतील.