या मंदिरात रामासोबत नाहीत सीता आणि लक्ष्मण


राजस्थानातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माउंट अबू येथे जगातील एकमेव असे एक राममंदिर आहे जेथे भगवान राम एकटेच विराजमान आहेत.या मंदिराला सर्वेश्वर रघुनाथ मंदिर असे म्हणतात. येथे रामासोबत सीता नाही तसेच बंधू लक्ष्मणसुद्धा नाही. विशेष म्हणजे ही मूर्ती अतिप्राचीन म्हणजे ५५०० वर्षे जुनी आणि स्वयंभू असून अबूच्या प्रसिद्ध नाक्खी लेक मध्ये ती सापडली असे सांगतात. या मुर्तीची मंदिरात स्थापना पहिले जगद्गुरू रामानंदचार्य यांनी केली. वैष्णव समाजाच्या चार संप्रदायांचे ते मुख्य होते.


मंदिरात ही मूर्ती ४०० वर्षांपूर्वी स्थापन केली गेली असल्याचे सांगतात. राम या मंदिरात तपस्वी वेशात आहेत. रामनवमीला येथे मोठी यात्रा भरते तसेच दरवर्षी मूर्तीची नगरप्रदक्षिणा काढली जाते. या मंदिराच्या आवारात प्राचीन रामकुंड आहे. असे सांगतात, येथे राम आणि लक्ष्मण स्नान करत असत. गुरु वसिष्ठ यांच्या आश्रमात शिक्षणासाठी राम लक्ष्मण राहिले होते तेव्हा ते या कुंडात स्नान करत असत. रामाचे गुरुकुल याच भागात होते. या कुंडातील जल अतिशय पवित्र मानले जाते. येथे स्नान केल्यास अनेक रोगातून मुक्ती मिळते असा भाविकांचा विश्वास आहे पण या कुंडातील पाणी कधीही खराब होत नाही त्यामुळे ते पिण्यासाठी वापरले जाते. अनेक भाविक तीर्थ म्हणून हे जल घरी नेतात.


अबूचे मूळ नाव अर्बुदांचल. पुराणात या भागाचा उल्लेख अर्बुदाराण्य असा होतो. हा दंडकारण्याचा भाग होता असे सांगतात. याच अरण्यात राम वनवास भोगताना राहिले होते. वसिष्ठ आणि विश्वामित्र या ऋषीमध्ये मतभेद झाले तेव्हा वशिष्ठ येथे राहायला आले आणि येथेच त्यांनी पृथ्वीवरून असुरांचा नाश करण्यासाठी यज्ञ केला होता.

Leave a Comment