कृपाशंकरसिंह यांनी सोडला कॉंग्रेसचा हात


जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर लोकसभेत कॉंग्रेसने या विधेयकाला केलेला विरोध पाहून रागावलेल्या मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष व विलासराव देशमुख सरकारमधील माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी कॉंग्रेसचा हात सोडला आहे. कलम ३७० वरून कॉंग्रेसच्या भूमिकेचा निषेध करून पक्ष सोडणारे ते पहिले कॉंग्रेस नेते आहेत. मंगळवारी त्यांनी कॉंग्रेस सदस्यत्वाच्या राजीनामा देत असल्याची घोषणा केली.

कॉंग्रेसला मंगळवारचा दिवस घातवार ठरला आहे. याच दिवशी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या तिकिटावर रिंगणात उतरलेली बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने कॉंग्रेसशी काडीमोड घेतला तर कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनीही कॉंग्रेस मधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले.

कृपाशंकरसिंह म्हणाले, कलम ३७० वरून लोकसभेत चर्चा सुरु असताना ज्या मुद्द्यावर सर्वसामान्य जनता एकजुटीने सरकारच्या सोबत होती तेव्हा कॉंग्रेस नेते विचित्र विधाने करत होते. हा सर्व प्रकार अत्यंत चीड आणणारा होता त्यामुळे या संदर्भात त्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे कळविले होते. पुढे काय करायचे याचा अजून विचार केला नसल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र गेल्या आठवड्यात कृपाशंकर यांच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी गणपती दर्शनासाठी लावलेली उपस्थिती बरीच बोलकी आहे. कृपाशंकर भाजपच्या शिबिरात दाखल होतील असा तर्क केला जात आहे. एकेकाळी कॉंग्रेसची हक्काची व्होटबँक समजला जाणारा मुंबईतील उत्तर भारतीय समाज आज भाजपच्या पाठीमागे आहे मात्र भाजपकडे हिंदी भाषिक तोलामोलाचा नेता नाही. ही कमतरता कृपाशंकर दूर करू शकतात असे सांगितले जात आहे.

Leave a Comment