महाशक्तिशाली देशप्रमुखांनाही आवरता आलेले नाहीत अश्रू


चांद्रयान २ मोहिमेत थरारक क्षणी लँडर विक्रमचा संपर्क तुटला आणि इस्रोमध्ये एकदम शांतता पसरली. पंतप्रधान मोदींनी इस्रो वैज्ञानिकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले तेव्हा इस्रो प्रमुख बी. सिवन यांना अश्रू आवरता आले नाहीत आणि त्यांच्या या कृत्यावर उलटसुलट प्रतिक्रियांचा पाउस पडला. अजूनही या संदर्भात लोक मत व्यक्त करत आहेत. मर्द को दर्द होता नही, वे रोते नही अशी प्रतिक्रिया दिली जात आहे. मात्र मुळात भावना आवरता न येणे हा काही कमजोर असल्याचे लक्षण मानायचे काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

पंतप्रधान पदी विराजमान झाल्यावर मोदी हेही सेंट्रल हॉलमध्ये खासदारांसमोर भाषण करताना भावूक झाले होते पण डोळ्यात आलेले अश्रू कॅमेऱ्यापासून लपविण्यात ते यशस्वी झाले होते हे अनेकांना आठवत असेल. अर्थात गळा भरून आल्याने काही वेळ मोदी बोलू शकले नव्हते. इतकेच कशाला महाशक्ती म्हणविल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाना अनेकदा सार्वजनिक सभेत बोलताना अश्रू आवरता आलेले नाहीत. माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या वडिलांचे निधन झाल्यावर २०१८ मध्ये अंतिम संस्कारानंतर भाषण करताना बुश रडले होते.


अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना तर अनेकदा अनेक कार्यक्रमात डोळे पुसताना पाहिले गेले आहे. २०१६ मध्ये बंदूक कायद्यासंदर्भात केलेल्या भाषणात, सँडी हुक एलिमेंटरी स्कूल मध्ये २० विद्यार्थ्यांवर झालेल्या गोळीबार प्रसंगी ओबामांना रडू आवरले नव्हते. बलाढ्य आणि पोलादी अशी ओळख असलेले रशियाचे अध्यक्ष पुतीन यानाही २०१२ च्या प्राथमिक निवडणुकात विजय मिळाल्यावर क्रेमलिनमध्ये सार्वजनिक सभेत बोलताना रडू कोसळले होते. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो हे तर अनेकदा भावनाविवश झालेले दिसले आहे. सिरीया शरणार्थी, मशीद गोळीबार पिडीत अंत्यसंस्कार प्रसंगी टूडो यांच्या अश्रूंचा बांध फुटला आहे.


टेनिस स्टार फेडरर, राफेल नदाल, इव्हान जोकोविच, यासारखे तगडे टेनिसपटू सुद्धा अनेकदा भावनावेग आवरू शकलेले नाहीत. त्यामुळे आसू हे ताकदीचे प्रतिक आहेत, कमजोरीचे नाही. तुम्ही रडू शकता म्हणजे तुमच्या भावना जिवंत आहेत आणि त्या स्वीकारण्याची तुमची ताकद आहे. त्यात पुरुष आणि महिला असा भेद करता कामा नये असेही मत अनेकजण नोंदवीत आहेत.