आठवणींच्या हिंदोळ्यावर विकणार वॉकमन?

आजची पिढी स्मार्टफोनची पिढी. ती आपली बहुतांश सगळी कामे स्मार्टफोनवरच करते, त्यात गाणी किंवा संगीत ऐकणे हेही आलेच. आजच्या घडीला गाणी ऐकण्यासाठी इतकी अॅप्स उपलब्ध आहेत, की त्यासाठी वेगळे एखादे उपकरण वापरावे लागते हेही अनेकांच्या गावी नसते. मात्र निव्वळ गाणी ऐकण्यासाठीच्या एका उपकरणाने दोन पिढ्यांना भूरळ पाडली होती आणि या उपकरणाने एका नव्या संस्कृतीला जन्म दिला, हे निखळ सत्य आहे. त्या उपकरणाची जादू एवढी, की आज 40 वर्षांनंतरही त्या कंपनीला पुन्हा हे उपकरण आणण्याचा मोह पडला आहे.

तंत्रज्ञान क्षेत्रातील सोनी या दिग्गज जपानी कंपनीने 1979 मध्ये एक उत्पादन सादर केले होते – सोनी वॉकमॅन. त्या काळात सुपरमॅन अत्यंत लोकप्रिय होता आणि प्रेसमन नावाचा एक ऑडिओ रेकॉर्डर त्या काळात होता. त्यावरून प्रेरित होऊन सोनीने या नावाची निवड केली. पाहता पाहता या उपकरणाने इतकी लोकप्रियता मिळवली की त्याने जग पादाक्रांत केले. आज वॉकमन हा शब्द जगातील जवळजवळ सर्व भाषांत आहे.

इतकेच नाही तर अगदी छोट्या-मोठ्या कंपन्यांनीही तयार केलेल्या अशा उपकरणांना वॉकमन हेच नाव मिळाले. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील जपानी कौशल्याचे ते एक प्रतीक बनले आणि 1980 व 90च्या दशकात प्रत्येक तरुणाला हवेहवेसे वाटणारे असे ते उपकरण ठरले. संगीत ऐकण्यासाठी एका जागी बसून राहण्याची गरजच त्यामुळे संपली आणि चालता-फिरता संगीत ऐकणे त्यामुळे शक्य झाले. वॉकमन वापरणारे आणि त्याचे चाहते असणारे लोकही आज पन्नाशीच्या पुढे आहेत.

सोनीने 1 जुलै 1979 रोजी वॉकमन सादर केला तेव्हा तेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेत तेलाचे दुसरे संकट होते. त्यावेळी एका काळ्या-निळ्या विटेसारखी त्याची रचना होती आणि टीपीएस-एल 2 असे त्याचे नाव होते.

त्यावेळी त्याची किंमत 33 हजार येन एवढी म्हणजे आजच्या किंमतीत 300 डॉलर (21483.84 रुपये) एवढी होती. पहिल्या पिढीच्या वॉकमनमध्ये रेकॉर्ड करण्याची सोय नव्हती. तरीही त्याच्यातील स्टिरिओ म्युझिक प्लेबॅक सुविधेमुळे आधी जपानी तरुणांची आणि नंतर जगातील लोकांची मने जिंकली. गंमत म्हणजे या वॉकमनमध्ये दोन लोकांना एकाच वेळी ऐकण्याची सोय होती. त्यासाठी “गायज्” आणि “डॉल्स” अशी नावे असलेली दोन हेडसेट जॅक होती.

त्यावेळी संगीत श्रवणाच्या बाबतीत हे एक क्रांतिकारक उपकरण होते. मात्र पहिल्या महिन्यात वॉकमनची केवळ 3,000 युनिट्स विकल्या गेली. त्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांची काहीशी निराशाच झाली. मात्र त्यानंतर वॉकमनच्या विक्रीने भरारी घेतली आणि जगभरात 15 लाख वॉकमनची विक्री झाली. त्यानंतर डब्ल्यूएम -2 हे दुसऱ्या पिढीतील मॉडेल आले आणि ते 25 लाख 80 हजार युनिट विकले गेले. त्यानंतर पुढच्या चार दशकांत सोनीने सुमारे 42 कोटींपेक्षा जास्त वॉकमेन विकेल आणि सुमारे 15 वर्षांपूर्वी त्याच्या मॉडेलची संख्या 1,000 झाली तेव्हा तिने मॉडेलची गणती करणेही थांबवली.

अशा या वॉकमनला आधी 1980 च्या दशकात कॉम्पॅक्ट डिस्कने (सीडी) आणि 1992 मध्ये मिनीडिस्क वॉकमन तंत्रज्ञानाने जबर आव्हान दिले. तरीही त्याचा खप कमी झाला नाही आणि म्हणूनच सोनीने अगदी अलीकडेपर्यंत, म्हणजे 2010 पर्यंत कॅसेट-टेप वॉकमनचे उत्पादन चालूच ठेवले.

यथावकाश स्मार्टफोन आणि आयपॉडच्या काळात या उपकरणाची सद्दी संपली आणि ते मागे पडले. मात्र वॉकमॅन 40 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून सोनीने पुन्हा याची नवी आवृत्ती सादर केली आहे. ‘एनडब्लू-ए 105 टीपीएस’ असे नाव या नव्या आवृत्तीला देण्यात आले आहे.

या नव्या वॉकमनमध्ये ऑडिओ बॅकसोबत म्यूझिक स्ट्रीमिंग आणि एका चार्जवर 26 तास चालणारा बॅटरी बॅकअप असणार आहे. यात 16 जीबीचे स्टोरेज असून 3.6 इंच आकाराचा डिस्प्ले असेल. गंमत म्हणजे जुन्या वॉकमनमध्ये कॅसेट चालत असे परंतु आता ते तंत्रज्ञानच कालबाह्य झाले आहे. त्यामुळे सोनीच्या या वॉकमनमध्ये कॅसेट चालत नाही, परंतु जुन्या वॉकमनची अनुभूती देण्यासाठी कॅसेटचा स्क्रीनसेव्हर ठेवण्यात आला आहे. त्याची किंमत 500 डॉलर असेल.

सोनीने याला 40व्या वर्धापनदिनाची आवृत्ती असे नाव दिले असून या निमित्ताने आठवणींची सफर करा, असे आपल्या चाहत्यांना आवाहन केले आहे. कंपनीच्या या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या चाहत्यांची कमी नाही. मात्र त्यानिमित्ताने तंत्रज्ञान किती लवकर इतिहासजमा होते, हे अनुभवायला मिळणार आहे.

Leave a Comment