शशि थरूर यांच्या मनात चाललंय काय!

शशी थरूर हे काँग्रेसमधील शहाणे-सुरते, अभ्यासू आणि आदरप्राप्त व्यक्तिमत्व. संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे अधिकारी म्हणून, केंद्रीय मंत्री म्हणून आणि निव्वळ विद्वान म्हणूनही त्यांनी आपली छाप पाडली आहे. काँग्रेसच्या दृष्टीने थरूर म्हणजे एक मौल्यवान मालमत्ता होय. अशा या थरूर यांनी गेल्या काही दिवसांपासून ज्या वक्तव्यांच्या फैरी झाडल्या आहेत, त्यावरून त्यांच्या मनात काय चाललेय याचा अंदाज घेणे कठीण बनले आहे.

अगोदर थरूर यांनी “बहुमताचे तुष्टीकरण हे हिंदी प्रदेशात काँग्रेस पक्षाचे पुनरुज्जीवन करण्याचा उपाय नाही” हे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली.

काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करतो, हा भाजपचा आवडता आरोप आहे. याच आरोपाची राळ उठवून भाजपने मोठ्या प्रमाणात यश मिळवले, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे भाजपवर मात करण्यासाठी काँग्रेसने मवाळ हिंदुत्वाचा (सॉफ्ट हिंदुत्व) मार्ग धरावा, असा अनेकांचा आग्रह आहे. यात काँग्रेस पक्षाच्या आतील आणि बाहेरील अशा व्यक्तींचा समावेश आहे. मात्र काँग्रेसने हा मार्ग चोखाळू नये, असे थरूर यांचे म्हणणे आहे. त्याला त्यांनी “हिंदुत्व लाइट” असे म्हटले आहे. म्हणजे कोका कोलाची जशी लाइट आवृत्ती असते तशी ही हिंदुत्वाची लाइट आवृत्ती. या लाइट हिंदुत्वाचा परिणाम केवळ काँग्रेस शून्य होण्यामध्ये होईल, असे ते म्हणाले होते. ‘दि हिंदू वे : अॅन इंट्रोडक्शन टू हिंदुइज्म’ हे थरूर यांचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केले, हे विशेष.

सोमवारी मात्र त्यांनी “मी आजीवन कारकीर्द म्हणून काँग्रेसमध्ये सामील झालेलो नाही,” असे सांगून आधीच्या खळबळीवरही कडी केली.

“मी आयुष्यभराची कारकीर्द म्हणून काँग्रेस पक्षात आलो नाही. मी आलो होतो कारण सर्वसमावेशक आणि पुरोगामी भारताच्या विचारांच्या प्रगतीसाठी हे सर्वोत्तम वाहन आहे असा माझा विश्वास होता. फक्त जागांसाठी किंवा मतांसाठी आम्ही या विचारांचा त्याग करू शकत नाही,” असे सोमवारी नवी दिल्ली येथे युवक काँग्रेसच्या कार्यक्रमात ते म्हणाले. या आठवड्याच्या सुरूवातीला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केल्याचा आरोप केरळ काँग्रेसने केला होता. मोदींची बदनामी करून विरोधी पक्षांना फायदा होणार नाही, असे काँग्रेसचे अन्य नेते जयराम रमेश यांनी म्हटले होते. त्याला थरूर यांनी पाठिंबा दिला होता. मोदी जर चांगले काम करत असतील तर त्यांचे कौतुक केले पाहिजे, असे ते म्हणाले होते. याचा संदर्भ त्या वक्तव्याला लावण्यात आला.

या त्यांच्या वक्तव्यावरून गोंधळ माजणारच होता. तसा तो झाला आणि थरूर यांनी लगोलग खुलासाही केला. माझे हे वक्तव्य काँग्रेस सोडण्याची तयारी असल्याच्या स्वरूपात मांडण्यात आले. आपण केवळ माध्यमांच्या सनासनाटीप्रेमावर निराश होऊ शकतो, असे ट्वीट त्यांनी केले.

गेल्या आठवड्यातही त्यांनी अशाच प्रकारचे मत मांडले. “एके काळी जे आमचे मतदार होते, जे काँग्रेसला मत देत होते ते आता नरेंद्र मोदी व भाजपला मत देत आहेत. आम्हाला यावर विचार करावा लागेल,” असे ते म्हणाले.

थरूर यांच्या या मत मतांतरावरून त्यांची पुढची योजना काय आहे, याचा अंदाज येत नाही. येथे लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे थरूर हे सध्या विविध आघाड्यांवर लढत आहेत. खुनासारख्या गंभीर आरोपांवरून ते कायदेशीर लढाईत गुंतले आहेत. पत्नी सुनंदा पुष्कर यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे आरोपपत्र त्यांच्यावर ठेवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी 31ऑगस्ट रोजी दिल्लीतील न्यायालयाकडे परवानगी मागितली होती.

तसेच, भाजपने लोकसभा निवडणुका जिंकल्या तर भारतात ‘हिंदू पाकिस्तान’ निर्माण होईल, असे वक्तव्य त्यांनी गेल्या वर्षी केले होते. त्यावरून कोलकातातील न्यायालयाने 13 ऑगस्ट रोजी थरूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते.

त्यामुळे काँग्रेसच्या अन्य नेत्यांप्रमाणेच कज्जे-खटल्यांतून सुटण्यासाठी ते भाजपच्या जवळ जात आहेत का, किंवा खरोखरच तळमळीने तो बोलत आहेत याचा अदमास घेणे अवघड बनले आहे. मात्र काँग्रेसच्या अन्य नेत्यांपेक्षा अधिक प्रखरपणे आणि वारंवार मत मांडण्यात थरूर पुढे आहेत, हे निश्चित. त्यामुळे त्यांच्या पुढच्या चालींवर लक्ष ठेवणे रंजक ठरणार आहे.