पबजीचे वाढते बळी – एक जीवघेणा ट्रेंड

पबजी या मोबाईलवरील खेळाविषयी आपल्याकडे बऱ्यापैकी चर्चा होते. हा एक ऑनलाईन गेम असून हा खेळ खेळणाऱ्या व्यक्तीला स्वतःला जीवंत ठेवत दुसऱ्याला मारावे लागते. जो खेळाडू अशा तऱ्हेने जीवंत राहतो तो विजेता ठरतो. हा खेळ खेळणारी व्यक्ती एका आभासी जगात वावरते मात्र यातील चित्रे अत्यंत वास्तवदर्शी असतात. त्यामुळे खऱ्या आणि खोट्या जगातील भेद पुसट होतो. या खेळामुळे खासकरून लहान मुले हिंसक बनल्याचे निरीक्षण अनेकांनी नोंदवले आहे. आतापर्यंत केवळ चर्चेच्या पातळीवर ही भीती आता वास्तवात उतरू लागली आहे.

कर्नाटकात घडलेल्या एका भयानक आणि थरारक घटनेने पबजीचा धोका समोर आणला आहे. बेळगावमधील एका 21 वर्षीय युवकाने पबजी खेळू न दिल्यामुळे प्रत्यक्ष आपल्या वडिलांचा शिरच्छेद केल्याची घटना समोर आली आहे. रघुवीर कम्मार या 21 वर्षांच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हे जघन्य कृत्य केले आहे. रघुवीरला मोबाईलवर पबजी खेळण्याचे व्यसन असल्याचा आरोप आहे. रविवारी रात्री रघुवीरने वडील शंकरप्पा कम्मार यांच्याशी साधला आणि फोन रिचार्ज करण्यासाठी पैसे मागितले जेणेकरून त्याला हा खेळ खेळता यावा.

सोमवारी पहाटे बेळगाव जिल्ह्यातील कटकी पोलिसांना शंकरप्पाच्या कुटूंबियांचा फोन आला. शंकरप्पाचा शिरच्छेद झाला असून त्याचे पाय कापण्यात आल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आणि हे नृशंस कृत्य केल्यानंतर रघुवीर फरार झाल्याची माहितीही दिली. त्याचा मोबाईल इंटरनेट पॅक टॉप अप करायचा होता आणि शंकरप्पाने त्याला पैसे देण्यास नकार दिला, असे या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे शंकरप्पा हे पोलिस विभागात कार्यरत होते. गेले महिनाभर ते आपल्या मुलाला पबजीच्या कब्ज्यातून सोडवण्याचा प्रयत्न करीत होते. आपला मुलगा या खेळाच्या आहारी गेल्याचे शंकरप्पाने आपल्या सहकाऱ्यांना सांगितले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी रघुवीरला पबजी खेळणे थांबवण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्याने ते ऐकले नाही. रघुवीर महाविद्यालयात जात नव्हता आणि तो बेरोजगारही होता.

ही काही अशा प्रकारची पहिलीच घटना नाही. काही महिन्यांपूर्वी रेल्वे रुळावर उभे राहून पबजी खेळणाऱ्या दोन तरुणांचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाला. ते गेम खेळण्यात एवढे मग्न झाले होते, की त्यांना रेल्वेचा आवाजही ऐकून आला नाही. उत्तर प्रदेशातील गाजियाबाद जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने या गेमच्या नादाने आपले राहते घर सोडले. जालंधरमध्ये एका किशोरवयीन मुलाने आपल्या वडिलांच्या खात्यातून 50 हजार चोरले होते. सतत 45 दिवस हा खेळ खेळल्यान मज्जातंतूंना गंभीर नुकसान होऊन एका 20 वर्षीय मुलाचा अलीकडेच मृत्यू झाला.

पबजीचा हा खेळ प्रचंड हिंसक आहे. यात क्षणाक्षणाला गोळ्यांचा वर्षाव होत असतो आणि त्या खेळाडूला त्यातून वाचायचे असते. यात मोठ्या प्रमाणावर थरार असल्यामुळे तरुणांना आणि लहान मुलांना त्याची सहज भुरळ पडते.

वास्तविक प्रत्येक विद्यार्थ्याने विद्यार्थी दशेत असतांना नियमित अभ्यासासोबतच किमान एक तास मैदानी खेळ खेळायला हवा. मैदानी खेळ खेळल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, सातत्य व जिद्द यासारखे गुण निर्माण होऊन त्यांचे मानसिक व शारीरिक व्यक्तिमत्व विकसित होते. एकदा एक युवक स्वामी विवेकानंदांकडे गेला आणि त्यांना म्हणाला, की स्वामीजींनी त्याला भगवद्गीता शिकवावी. स्वामी विवेकानंद यांनी त्याला आधी सहा महिने फुटबॉल खेळायला सांगितले. प्रार्थना करण्यापेक्षा फुटबॉल खेळण्याने तू ईश्वराच्या जास्त जवळ जाशील, असे त्यांनी त्याला सांगितले.

दुर्दैवाने विद्यार्थ्यांच्या हातात संगणक आणि मोबाईल आले. त्यामुळे खरोखरच्या मैदानी खेळांऐवजी पबजीसारख्या ऑनलाईन आणि आभासी खेळांना जास्त महत्त्व मिळते. पबजी हा खेळ 2017 मध्ये रिलीज झाला आणि दोन वर्षांच्या आत तो सर्वात लोकप्रिय खेळ बनला. जगभरात 40 कोटी मुले आणि तरुण हा खेळ रोज खेळतात. भारतात पबजी खेळणाऱ्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. व्हिडिओ गेमच व्यसन हे वास्तविक मानसिक विकाराचे लक्षण असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (हू) मान्य केले आहे. त्याची काही लक्षणेही हूने दिली आहेत.

उदाहरणार्थ, संबंधित व्यक्तीचे जीवन गेमिंगच्या भोवती फिरत राहते आणि इतर क्रियाकलापांमधील स्वारस्य कमी होते. या खेळाडूला आपल्या खेळाचे प्रमाण नियंत्रित करण्यास किंवा मर्यादित करता येत नाही. गेमिंगमुळे शाळेतील गुण, रोजगार किंवा नातेसंबंधांमध्ये लक्षणीय नुकसान झाले तरी हे खेळाडू त्यांना जुमानत नाहीत. या खेळाचा धोका ओळखूनच चीनने 13 वर्षे वयापर्यंतच्या मुलांना हा खेळ खेळण्यावर बंदी घातली आहे. भारतातही अशा उपाययोजनांची सक्त गरज आहे, नाही तर अशा घटना घडतच राहतील.

Leave a Comment