पोलिसाने कारवर मारली काठी, चालकाचा हार्ट अटॅकने मृत्यू

ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्याबरोबर झालेल्या वादावादीमध्ये एका व्यक्तीचा हार्ट हटॅकने मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पोलिस कर्मचारी फरार झाला आहे. यावेळी त्या व्यक्तीचे आई-वडिल देखील त्याच्याबरोबर होते. त्या व्यक्तीच्या वडिलांना पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आयटी कंपनीत काम करणारे गौरव शर्मा आपल्या आई-वडिलांबरोबर इंदिरापुरम येथे जात होते. सेक्टर 62 जवळ येताच एका ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्याने त्यांना रोखले.

गौरवने कार साइडला लावताच पोलिस कर्मचाऱ्याने गाडीवर तीन-चारवेळा दांडा मारला. त्यानंतर पोलिस कर्मचाऱ्याबरोबर वादावादी सुरू असतानाच अचानक गौरव चक्कर येऊन जमिनीवर पडला. या घटनेनंतर पोलिस कर्मचारी तेथून फरार झाला.

या घटनेनंतर गौरवचे वडिल त्याला आधी फोर्टिस हॉस्पिटल आणि त्यानंतर कैलाश हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. डॉक्टरांनी त्याला मृत म्हणून घोषित केले. हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. गौरवच्या वडिलांनी पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, याबाबतची माहिती त्यांना मीडिया रिपोर्टमधूनच आतापर्यंत मिळालेली असून, या घटनेची चौकशी करण्यात येईल.