खोट्या दाढी-मिशा लावून बनला 81 वर्षांचा, विमानतळावर पकडले अधिकाऱ्यांनी

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी आश्चर्यकारक घटना घडली. एक 32 वर्षीय युवकाने 81 वर्षीय म्हाताऱ्याप्रमाणे वेश परिधान करत अमेरिका जाण्याच्या तयारीत होता. याचवेळी सीआयएसएफने त्याला पकडले. या युवकाचे नाव जयेश पटेल असून, तो अहमदाबादचा राहणारा आहे. त्याने अमरिक सिंग नावाने बनावट पासपोर्ट बनवला होता व त्यामध्ये वय 81 दाखवले होते.

सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपासणीसाठी जेव्हा त्याला थांबण्यात आले त्यावेळी त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्याला व्हिलचेअरवरून उठण्यास सांगितल्यावरही तो उठला नाही. तसेच बोलताना तो डोळ्यात डोळे घालून देखील बोलू शकत नव्हता. तपासणी केल्यावर त्याची खरी ओळख समोर आली.

सीआयएसएफने सांगितले की, त्याने पासपोर्टवर जन्मतारीख 1 फेब्रुवारी 1938 नोंदवली होती. केस आणि दाढीला देखील पांढरा रंग दिला होता. मात्र अधिकाऱ्यांना त्याच्या त्वचेवरून तो म्हातारा व्यक्ती असल्याचे वाटत नव्हते. त्यानंतर चौकशी केल्यावर त्याने खरे सांगितले. नंतर त्याला इमीग्रेशन अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले.