मुलगा होणार कि मुलगी हे सांगतो हा डोंगर


कोणत्याही घरात पहिला पाळणा हलणार असल्याची चाहूल लागली कि मुलगा असेल कि मुलगी याची चर्चा सुरु होते. भारतात मुलाचा जन्म अधिक हवाहवासा असल्याने सोनोग्राफीच्या तंत्रातून गर्भात मुलाचा जीव आहे कि मुलीचा हे अगोदरच जाणून घेऊन गर्भातच मुलीची हत्या करण्याच्या प्रकाराने हैदोस मांडला आहे. त्यासाठी जन्मपूर्व लिंगचाचणीवर कायद्याने बंदी घातली गेली आहे. असे असले तरी झारखंड राज्यात एक भाग असा आहे जेथे घरात मुलगा जन्माला येणार कि मुलगी याचे भविष्य सांगितले जाते आणि हे भविष्य सांगतो एक खडकाळ डोंगर.

झारखंड मध्ये ही परंपरा खूप प्राचीन म्हणजे जवळजवळ ४०० वर्षे जुनी आहे. लोह्दरागा भागात खुखरा या गावात हा डोंगर आहे. या डोंगरात एका खडकावर एक चंद्रासारखा आकार आहे. गर्भवती महिलेने येथे येऊन एका ठराविक अंतरावरून येथे एक दगड मारायचा. दगड मधोमध लागला तर मुलगा होणार आणि या आकाराच्या बाहेर लागला तर मुलगी होणार असे समजले जाते. या चाचणीसाठी एक पैसाही खर्च होत नाही आणि येथील स्थानिक सांगतात कि हा तोडगा बरेचवेळा खरा ठरतो. नागवंशी राजाच्या शासनकाळात हा रिवाज सुरु झाला असेही सांगितले जाते.

तेव्हापासून म्हणजे ४०० वर्षांपासून हा डोंगर मुलगा कि मुलगी याचे भविष्य सांगतो आहे आणि त्यावर अजूनतरी सरकारने बंदी घातलेली नाही.

Leave a Comment