असंगाशी संग टळला – अखेर ट्रम्पनी तालिबानशी चर्चा थांबविली

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर तालिबानशी चर्चा थांबवण्याची घोषणा केली. त्यामुळे अफगाणिस्तानात अमेरिका करत असलेला असंगाशी संग टळला आहे.

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये नुकताच दहशतवादी हल्ला झाला. त्यात अमेरिकेच्या सैनिकासह 12 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी तालिबानने स्वीकारली. त्यानंतर ट्रम्प यांच्या पुढे दुसरा पर्यायच राहिला नव्हता. त्यामुळे त्यांनी शांतता वाटाघाटी रद्द करण्याची शनिवारी रात्री घोषणा केली. रविवारी अफगाणिस्तानचे अध्यक्ष आणि तालिबान नेते आपल्याला भेटणार होते. मात्र तालिबान्यांनी हल्ल्याची जबाबदारी घेतल्यानंतर मी ही बैठक आणि शांतता वाटाघाटी थांबवल्या, असा दावा त्यांनी केला.

“स्वतःच्या सौदेबाजीची ताकद वाढावी म्हणून इतक्या लोकांना ठार मारणारे कोणत्या प्रकारचे लोक असतील,” असा प्रश्न ट्रम्प यांनी ट्विटमध्ये केला. “जर या अत्यंत महत्वाच्या शांततेच्या चर्चेदरम्यान ते युद्धबंदीवर सहमत नसतील आणि 12 निष्पाप लोकांना ठार मारत असतील तर त्यांच्यात अर्थपूर्ण तडजोडीची बोलणी करण्याची शक्तीही नसेल,” असे त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले.

अफगाणिस्तानात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी तालिबानशी चर्चा करण्याचे धोरण अमेरिकेने स्वीकारले आहे. या चर्चेची नववी फेरी नुकतीच कतारमधील दोहा येथे पार पडली. त्यामुळे अफगाणिस्तानातील 18 वर्षांपासून सुरू असलेले युद्ध संपण्याची आशा निर्माण झाली आहे. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ गनी यांचा नियोजित अमेरिका दौरा हा या करारावर शिक्कामोर्तब करण्यासाठी एक पुढचे पाऊल ठरला असता. हा करार झाला असता तर येत्या काही महिन्यांत अफगाणिस्तानातून अमेरिकी सैनिकांना माघारी नेणे सोपे झाले असते.

त्याबदल्यात आपल्या नियंत्रणाखालील क्षेत्राचा वापर अमेरिका व त्याच्या मित्र देशांविरूद्ध वापरली जाणार नाहीत, याची हमी तालिबानला द्यावी लागेल. अमेरिकेचे मध्यस्थ राजदूत झलमय खलिझाद हे या चर्चेबाबत प्रचंड आशावादी आहेत.

दरम्यान, अफगाणिस्तानातील प्रत्यक्ष भूभागावर आपली ताकद दाखवून देण्यासाठी तालिबान्यांनी अलीकडे अफगाणिस्तानात हल्ले वाढवले ​​आहेत. तालिबानच्या दहशतवाद्यांनी गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील कुंदुझ आणि पुल-खुमरी या दोन शहरांमध्ये तसेच काबुलमध्ये दोन आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणले. यापैकी काबूलमध्ये झालेल्या स्फोटात अमेरिकी सैन्यातील सार्जंट एलिस ए. बॅरेटो ऑर्टिज याचा मृत्यू झाला. यामुळे यावर्षी अफगाणिस्तानात ठार झालेल्या अमेरिकन सैन्याची संख्या 16 पर्यंत पोचली आहे. दहशतवादी हल्ल्यांमध्ये होत असलेली ही वाढ या प्रदेशातील शांततेच्या प्रयत्नांना आडकाठी आणणारी आहे, असे अमेरिकेच्या एका वरिष्ठ सैन्य कमांडरने शनिवारी सांगितले.

खरोखर अमेरिकेत ही बैठक झाली असती आणि ट्रम्प या गटाच्या नेत्यांना अमेरिकेत भेटले असते तर ती एक मोठी घटना ठरली असती. कारण एखाद्या तिसऱ्या देशात चर्चा व्हावी, ही तालिबान या दहशतवादी गटाची मागणी होती. आणखी एक विशेष म्हणजे येत्या 11 सप्टेंबर रोजी या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 2001 मध्ये झालेल्या हल्ल्याला 18 वर्षे पूर्ण होणार आहेत. त्या हल्ल्यात जवळजवळ 3,000 लोक ठार झाले होते आणि अमेरिकेच्या भूमीवर झालेल्या या प्रमुख दहशतवादी हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वीच ही घटना घडली असती. हा हल्ला घडवून आणणाऱ्या अल कायदाच्या दहशतवाद्यांना तालिबान्यांनी हल्ला करण्यापूर्वी आणि नंतर आश्रय दिला होता.

गेले सुमारे शतकभर गृहयुद्धाला सामोरे जाणाऱ्या अफगाणिस्तानावर तालिबानने सुमारे वीस वर्षांपूर्वी कब्जा मिळवला. या तालिबानला फूस होती ती पाकिस्तानची. न्यूयॉर्कमधील हल्ल्यानंतर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सत्तेने तालिबानचे पारिपत्य केले खरे, परंतु तालिबान नष्ट झाले नाहीत. तालिबानची धर्मांध, क्रूर आणि निर्घृण राजवट चिरडण्यासाठी अमेरिकेने 2001 साली अफगाणिस्तानवर हल्ला केला. महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या अत्यंत आधुनिक शस्त्रास्त्रांपुढे आपला टिकाव लागणे अशक्य आहे, हे ओळखून तालिबानी दहशतवाद्यांनी पाकिस्तानमध्ये स्थलांतर केले.

अशा या तालिबानशी चर्चा करणेच हेच मुळात चुकीचे होते. तरीही आपल्या 20 हजार सैनिकांना सुरक्षित माघारी आणण्यासाठी अमेरिकेने त्यांच्याशी चर्चा सुरू केली. परंतु कुत्र्याच्या शेपटीप्रमाणे तालिबान हिंसेचा मार्ग सोडायला नाही, हे जाणवल्यानंतर त्यांना आता उपरती झाली आहे. अश्रफ गनी यांनी तर ही चर्चा निरर्थक असल्याचे आधीच सांगितले होते. सामान्य अफगाणी नागरिकांमध्येही तालिबानच्या जुलुमी राजवटीच्या स्मृती अद्याप कायम आहेत. त्यामुळे अमेरिकी सैन्य गेल्यानंतर पुन्हा यादवी निर्माण होण्याची भीती त्यांना आहे. त्यामुळे देर आये, दुरुस्त आये या न्यायाने उशिरा का होईना ट्रम्प यांनी योग्य पाऊल उचलले आहे. त्याचे स्वागत करायला हवे.

Leave a Comment