प्लास्टिकच्या निरुपयोगी वस्तूंचा असा ही उपयोग

waste
आपल्या दररोजच्या वापरामध्ये अनेक प्लास्टिकच्या वस्तूंचा समावेश असतो. या वस्तू अश्या असतात की त्यांचा एकदा वापर पूर्ण झाला, की त्या पुन्हा वापरल्या न जाता बहुतेकवेळी टाकूनच दिल्या जातात. अश्या या वस्तू म्हणजे शँपू किंवा लिक्विड सोप च्या बाटल्या, दुधाची रिकामी पकेट्स, आणि तत्सम प्लास्टिकच्या वस्तू. या वस्तू प्रत्येकाच्याच घरामध्ये आढळणाऱ्या आहेत, त्यामुळे कचऱ्यामध्ये फेकल्या जाणाऱ्या या वस्तूंचे प्रमाणही मोठे आहे. या प्लास्टिक कचऱ्याचा योग्य उपयोग कसा केला जावा यावर समाधान शोधून काढण्यात ‘बेंगळूरू स्वच्छ’ ला यश आले आहे.
waste1
बेंगळूरू शहरामध्ये दररोज सुमारे चार हजार टन प्लास्टिकचा कचरा गोळा केला जात असतो. या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची युक्ती ‘बेंगळूरू स्वच्छ’ ने शोधून काढली आणि त्वरेने त्याची अंमलबजावणी देखील सुरु केली आहे. ‘बेंगळूरू स्वच्छ’ ने बेंगळूरू महानगरपालिकेच्या मदतीने ही नवी योजना राबविली आहे. या योजनेअंतर्गत साधारण तीन ते चार टन प्लास्टिकचा कचरा वापरून त्यातून सुमारे दहा हजार ‘री-टाईल्स’ ( recycled tiles) तयार करण्यात आल्या असून, अश्या प्रकारच्या टाईल्सचा वापर पदपथांवर, भितींवर लावण्यासाठी आणि सार्वजनिक स्विमिंग पूल्समध्ये लावण्यासाठी केला जात आहे.
waste2
या ‘री-टाईल्स’, अँटी-स्किड, म्हणजेच निसरड्या न होणाऱ्या असून, पाणी पडल्यावरही कोणी त्यावर घसरून पडण्याची भीती नाही. तसेच या टाईल्स पस्तीस टन वजन पेलण्यास सक्षम असून, अग्नी प्रतिरोधकही आहेत. या टाईल्सची किंमत सत्तर ते नव्वद रुपये प्रती स्क्वेअर फुट इतकी असल्याने या सहज परवडण्याजोग्या आहेत. त्यामुळे बेंगळूरू येथे अनेक ठिकाणी पदपथांवर या टाईल्सचा वापर केला जात असलेला पहावयास मिळत आहे. प्लास्टिकचा कचरा नुसताच साठवून ठेवण्यापेक्षा किंवा प्लास्टिकचा कचरा जाळण्यापेक्षा अश्या प्रकारे प्लास्टिकचा कचरा ‘री सायकल’ करण्याचा हा पर्याय उत्तमच म्हणावा लागेल.

Loading RSS Feed

Leave a Comment