राजकीय सौदेबाजीचा चेहरा – डी. के. शिवकुमार

काँग्रेस नेते डोड्डलहळ्ळी केम्पेगौडा उर्फ डी. के. शिवकुमार यांना या आठवड्याच्या सुरूवातीला हवाला गैरव्यवहाराच्या आरोपावरून सक्तवसुली संचालनालयाने अटक केली. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ कर्नाटकाच्या विविध भागांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. ते स्वाभाविकच होते. परंतु शिवकुमार यांच्या समर्थनासाठी खुद्द कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा पुढे आल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. येडियुरप्पा यांनी त्यांच्या अटकेवर खेदही व्यक्त केला. अन्य पक्षांनीही त्यांच्या अटकेला विरोध केला. यामुळे भले भले संभ्रमात पडले आहेत.

कर्नाटकात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. ही सत्ता मिळवण्यासाठी भाजपला मोठा सव्यापसव्य करावा लागला आणि भाजपच्या या प्रयत्नात शिवकुमार हे एक मोठा अडथळा बनून उभे होते. त्यामुळे भाजपच्या मुख्यमंत्र्याने त्यांची पाठराखण करावी, हे धक्कादायक होते.

शिवकुमार यांच्या अटकेच्या निषेधार्थ रामनगर, चेन्नपट्टना आणि आजूबाजूच्या भागात बंदचे आव्हान करण्यात आले. येथील सर्व शाळाही बंद ठेवण्यात आल्या. सरकारी बसांवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. शिवकुमार यांच्या कनकपुरा या विधानसभा मतदारसंघात हा सर्व भाग येतो. यातून हे सिद्ध झाले, की शिवकुमार केवळ लोकप्रियच नाहीत तर अशा प्रकारे निदर्शने घडवून आणण्याइतपत श्रीमंतही आहेत.

काँग्रेसचे मुख्य रणनीतिकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवकुमार यांच्यात अनेक गुण आहेत.कर्नाटक विधानसभेच्या 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळेस आपल्याकडे 730 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी व त्यांच्या पत्नीने शपथपत्रात म्हटले होते. आपला व्यवसाय सामाजिक कार्यकर्ता असल्याचे त्यांनी सांगितले होते. शिवकुमार हे वोक्कालिंगा समुदायातील आहेत आणि याच भागात शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा याच भागातील आणि याच समुदायातील. देवेगौडा हे कर्नाटकातील वोक्कालिंगा समुदायाचे सर्वात मोठे नेते मानले जातात. त्यामुळे शिवकुमार यांच्याकडे ते नेहमी नवशिका नेता म्हणून पाहत असत.

महाविद्यालयात असल्यापासून शिवकुमार काँग्रेसशी संबंधित आहेत. ते 1983 पासून 1985 पर्यंत प्रदेश युवा काँग्रेसचे सरचिटणीस होते. जिल्हा पंचायत सदस्याच्या रूपात 1987 मध्ये त्यांनी पहिला निवडणूक विजय मिळवला. साथनूर या मतदारसंघातून त्यांनी 1985 साली देवेगौडा यांच्या विरोधात निवडणूक लढवला आणि थोड्याशा अंतराने त्यांचा पराभव झाला. ही एक मोठी गोष्ट होती, कारण देवेगौडा हे तत्कालीन रामकृष्ण हेगडे सरकारमधील ज्येष्ठ मंत्री होते. देवेगौडा यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि त्यांनी साथनूरची जागा सोडून दिली. त्यामुळे पुन्हा झालेल्या निवडणुकीत शिवकुमार निवडून आले. त्यानंतर देवेगौडा परिवाराशी त्यांचे संबंध ताणले गेले आणि आजपर्यंत ते ताणलेलेच आहेत.

वयाच्या 30 वर्षी शिवकुमार हे 1991 साली राज्याचे सर्वात तरुण मंत्री बनले. एस. बंगारप्पा यांच्या मंत्रिमंडळात ते 1992 पर्यंत राज्यमंत्री होते. आतापर्यंत ते सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. कृष्णांचे जावई व गेल्या महिन्यात आत्महत्या केलेले व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या ‘कॅफे कॉफी डे’मध्येही त्यांची गुंतवणूक असल्याचे सांगितले जाते.

आपल्या वैयक्तिक संपत्तीतून शिवकुमार यांनी राजकीय भांडवल उभे केले. दिवंगत विलासराव देशमुख यांचे सरकार 2002 मध्ये संकटात आले होते, त्यावेळी शिवकुमार हे कर्नाटकाचे शहर विकासमंत्री होते. त्यांनी महाराष्ट्राच्या सर्व आमदारांना ईगलटन रिसॉर्टमध्ये एकत्रित केले आणि मतदानाच्या दिवशी त्यांना मुंबईला घेऊन गेले. गेल्या वर्षी शिवकुमार यांनी 44 आमदारांना सुरक्षित ठेवले म्हणून अहमद पटेल गुजरातमधील राज्यसभेची जागा जिंकू शकले. त्यांच्याच रणनीतिमुळे 224 पैकी 104 आमदार असतानाही येडियुरप्पा विरोधी नेते बनले आणि एच. डी. कुमारस्वामी व काँग्रेसचे सरकार बनले. त्यावेळी तर शिवकुमार यांनी अमित शाह यांनाही धोबीपछाड दिली होती.

अशा या शिवकुमारांना अटक झाली तेव्हा येडियुरप्पा दुःखी झाले. शिवकुमार यांच्या अटकेने मला आनंद झालेला नाही. ते लवकर बाहेर यावेत, यासाठी मी देवाकडे प्रार्थना करेन, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. याचे कारण आहे येडियुरप्पा आणि शिवकुमार यांची राजकारणापलीकडची मैत्री आणि एकाच गैरव्यवहाराशी असलेला त्यांचा संबंध. हे प्रकरण घडले तेव्हा शिवकुमार हे येडियुरप्पा सरकारमध्ये मंत्री होते. बंगळुरुतील बेनीगानहळ्ळी भागात साडे चार एकर जमिनीशी संबंधित हे प्रकरण असून यातून शिवकुमार यांना फायदा झाल्याचा आरोप आहे. आज येडियुरप्पा आणि शिवकुमार वेगवेगळ्या पक्षांचे नेते असले तरी सर्वोच्च न्यायालयात दोघेही एकत्रच आपला बचाव करतात. न्यायालयात शिवकुमार यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी आहेत तर येडियुरप्पांचे वकील मुकुल रोहतगी हे आहेत.

येडियुरप्पा यांच्या प्रमाणेच शिवकुमार यांचे मित्र सर्व पक्षांत आहेत. उत्तरेतील अमर सिंह यांच्या प्रमाणे राजकीय सौदेबाजी हीच त्यांची ओळख आहे. या सगळ्या प्रकरणातून राजकीय सौदेबाजीचा आणखी एक चेहरा समोर आला, हेच खरे.

Leave a Comment