डीआरडीओच्या अध्यक्षांचे पाक मंत्र्याला सडेतोड उत्तर

डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे (डीआरडीओ) अध्यक्ष सतीश रेड्डी यांनी चांद्रयान 2 मोहिमीची खिल्ली उडणाऱ्या पाकिस्तानच्या मंत्र्याला सडेतोड उत्तर दिले आहे. रेड्डी म्हणाले की, ज्यांनी अंतराळ क्षेत्रात आतापर्यंत काहीच केलेले नाही ते त्यांना या मिशनबद्दल काय समजणार आहे. चांद्रयान 2 हे एक अवघड मिशन होते. याची प्रशंसा तेच लोक करू शकतात, ज्यांनी या क्षेत्रात काही कामगिरी केली आहे.

7 सप्टेंबरच्या मध्यरात्री भारताच्या चांद्रयान 2 मोहिमेला अखेरच्या क्षणी अडथळा आला होता. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याआधी विक्रम लँडरचा संपर्क २.१ कि.मी.वर तुटला. त्यानंतर पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरीने या मिशनची खिल्ली उडवली. चौधरीने ट्विट केले की, खेळणे चंद्राच्या ऐवजी मुंबईवर उतरले असेल. डियर इंडिया, जे काम येत नसेल त्यात पडू नये, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले होते.

मात्र चौधरीच्या या प्रतिक्रियेवर पाकिस्तानमध्येच टीका करण्यात आली. पाकिस्तानच्या युजर्सनी चौधरी यांचे विधान बालिश असल्याचे देखील म्हटले.

चौधरी यांच्या याच प्रतिक्रियेवर उत्तर देताना डीआरडीओचे अध्यक्ष म्हणाले की, ज्यांनी या क्षेत्रात अद्याप काहीच काम नाही केले, त्यांना याबद्दल काहीच कळणार नाही.

तसेच, चंद्रापासून 2.1 विक्रम लँडरचा संपर्क तुटला असला तर, लँडर व्यवस्थित असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. ऑर्बिटरने लँडरचे फोटो पाठवले आहेत.

Leave a Comment