होय, प्रयोगच – यशस्वी प्रयोग! अपयश नव्हे!

“विज्ञानात अपयश वगैरे काहीही नसते. जेवढे अधिक प्रयोग केले जातात, तेवढे नवे आणि ज्ञानात भर पाडणारे अनुभवच मिळतात. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी रात्रीचा दिवस करून अविरत प्रयत्न केले. त्यांच्याबद्दल मनात नितांत आदर आहे. संपूर्ण देशाला तुमच्यावर गर्व आहे. जय हिंद!”
भारताचा क्रिकेट कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केलेली ही भावना जवळजवळ संपूर्ण देशाची भावना आहे.

भारताचे ऐतिहासिक चंद्रयान-2 अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत चंद्राजवळ पोहचले, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे विक्रम लँडरचा संपर्क तुटला. तशी ही मोहीम यशस्वी झाली असली तरी ऐन मोक्याच्या क्षणी विक्रम लँडरचा संपर्क तुटला. या अडथळ्यामुळे नाही म्हटले तरी सर्वांची मने खट्टू झाली. कोट्यवधी देशवासियांनी रात्रभर जागून या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी रात्रीचा दिवस केला. परंतु तांत्रिक अडचणींनी डोके वर काढले आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांसहित सर्वांचीच निराशा झाली.

या निराशेवर सांत्वनापर शब्दांचे मलम लावण्यासाठीही अनेक जण पुढे आले आणि त्यात विराट कोहली हाही एक. विराटसोबतच माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर यांनीही इस्त्रोच्या कामगिरीचे कौतुक केले आणि भारतीय शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना सलाम करत मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला. या सर्व सेलिब्रिटींचे हे सांत्वनापर शब्द खूप महत्त्वाचे आहेत कारण क्रिकेट आणि युद्ध वगळता भारतीय लोक क्वचितच एवढ्या एकदिलाने वागतात.

चांद्रयान -2 हे जुलै 22 महिन्यात अवकाशात झेपावले होते. चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरणे हे त्याचे लक्ष्य होते. तब्बल50 दिवसांचा प्रवास करून त्याने लाखो किलोमीटरचे अंतर पार केले. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना केवळ 2.5 किमी अंतर राहिले असताना विक्रम या लँडरचा शास्त्रज्ञांशी संपर्क तुटला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर संपूर्ण प्रक्रियेचे साक्षीदार होण्यासाठी इस्त्रोच्या बंगळुरु येथील मुख्यालयात थांबले होते. मात्र उर्वरित भारतीयही टीव्हीच्या पडद्यावर डोळे लावून बसले होते. खरे तर ही घटना अपयश म्हणून गणण्यासारखी नाही. हा संपर्क पुन्हा होऊ शकतो आणि या मोहिमेला 95 टक्के यश आले असल्याचा निर्वाळा शास्त्रज्ञांनी दिला आहे. तरीही हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याची भावना भारतात निर्माण झाली होती. ही भावना कोणी तरी दूर करण्याची गरज होती.

इस्रोच्या बंगळुरु मुख्यालयातून मोदी निरोप घेत असताना इस्रोचे प्रमुख आणि चांद्रयान-2 अभियानाचे प्रभारी डॉ. शिवन भावुक झाले. चांद्रयान-2 अभियान थोडक्यात हुकल्यामुळे निराश झालेल्या डॉ. शिवन यांचा मोदींसमोरच बांध फुटला. यावेळी मोदींनी शिवन यांना संभाळले आणि परिवारातील मोठ्या व्यक्तीप्रमाणे त्यांचे सांत्वन केले. मोदी आणि डॉ शिवन यांच्यातल्या या संवादाचा व्हिडीओ लगेच व्हायरल झाला. म्हणूनच “आमच्या वैज्ञानिकांचा भारताला सार्थ अभिमान आहे! त्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि नेहमीच भारताचा गौरव वृद्धिंगत केला आहे. हे धैर्यवान होण्याचे क्षण आहेत आणि आम्ही धैर्यवान होऊ,” अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी इस्रोच्या तंत्रज्ञांना उभारी द्यायचा प्रयत्न केला.

अन्य महत्त्वाच्या व्यक्तींनीही त्यात आपापला वाटा उचलला. “स्वप्न जरी अपूर्ण राहिलं असेल तरी आपण खचून जायचं नाही. आपल्यातील आशावाद कायम जिवंत ठेवला पाहिजे. आपण नक्कीच यशस्वी होऊ”, असे ट्विट सेहवागने केले. आता भाजप खासदार असलेल्या गौतम गंभीरनेही इस्त्रो दमदार पुनरागमन करेल, असा विश्वास व्यक्त केला.

वर कोहली याचे जे वाक्य उद्धृत केले आहे ते याच मालिकेतील एक वाक्य. या सर्वांमध्ये कोहलीने वर्मावर बोट ठेवले. विज्ञानाच्या प्रांतात यश-अपयश असे काही नसते. असतात ते प्रयोग. प्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन याने म्हटले आहे, की एखाद्या प्रयोगात अयशस्वी झालो तर काय करू नये हे मला शिकायला मिळते. इस्रोच्या चंद्रयान मोहिमेतही हेच घडले. फरक हाच, की हा प्रयोग अपयशी नव्हता. प्रयोग अपयशी नव्हता, तर फक्त अडचण आली आहे. ती दूर होईल किंवा पुढच्या वेळी ही अडचण दूर करण्याचे आधीच प्रयत्न होतील. मात्र मोदींनी म्हटल्याप्रमाणे, “आपल्याला कदाचित या प्रवासात एखादा छोटासा धक्का बसला असेल, परंतु यामुळे उद्दीष्ट साध्य करण्यासाठीचा आपला उत्साह कधीही कमी होणार नाही.”

Leave a Comment