540 कर्मचाऱ्यांना झोमॅटोने दिला नारळ

ऑनलाइन फुड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने 540 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे.  हे कर्मचारी कंपनीच्या गुरूग्राम येथील ऑफिसमधील  होते. यामध्ये प्रामुख्याने कस्टमर सपोर्ट आणि डिलिव्हरी पार्टनर कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

कंपनीने सांगितले की, आम्ही 540 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. झोमॅटोच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत हे प्रमाण 10 टक्के आहे. या कपातीनंतर कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 5000 राहिली आहे. याचबरोबर कंपनीने म्हटले आहे की, ज्या कर्मचाऱ्यांना काढण्यात आले आहे त्यांना 2 ते चार महिन्यांचा पगार देण्यात येणार आहे. कंपनीच्या तंत्रज्ञानातील बदलामुळे ही कपात करण्यात आली आहे.

झोमॅटोचे म्हणणे आहे की, मागील काही महिन्यात आमच्या टेक्नोलॉजी प्रोडक्ट आणि प्लॅटफॉर्ममध्ये सुधारणा झाली आहे. आम्ही तक्रार सोडवण्याचा स्पीड देखील वाढवला आहे. आता आमच्याकडे केवळ 7.5 टक्के ऑर्डरसाठी सहयोगाची गरज पडते.

कंपनीने याआधी देखील 60 कर्मचाऱ्यांची कपात केली होती. तसेच 2015 मध्ये देखील खर्च वाचवण्यासाठी 300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले होते.

 

Leave a Comment