या शहरांमध्ये चेहऱ्याच्या माध्यमातून दिले जातात पैसे


बीजिंग – सध्या डिजिटल पेमेंटवर आपल्या देशात खूप जोर देण्यात येत आहे. स्मार्टफोनचा त्यासाठी वापरही वाढला आहे. आपल्याकडे डिजिटल पेमेंटसाठी पेटीएम, फोनपे, मोबीक्विकसारखे अनेक अॅप उपलब्ध आहेत. पण याबाबतीत आपला शेजारील देश सध्या आपल्याही एक पाऊल पुढे गेला आहे. त्या ठिकाणी नगदी किंवा कार्ड पेमेंट तर सोडा, स्मार्टफोन आणि डिजिटल वॉलेटने पेमेंट करण्याची पद्धतही जुनी झाली आहे.

आता या पद्धती मागे “फेशियल पेमेंट’ सेवेमुळे पडल्या आहेत. चिनी लोक वस्तूची खरेदी करतात आणि स्वत:च्या चेहऱ्याच्या माध्यमातून पेमेंट करतात. कॅमेऱ्याशी लोकांना जोडण्यात आलेल्या पीओएस मशीनच्या समोर उभे करताच पेमेंट होते. त्यांना त्यासाठी आधी एकदा त्यांच्या चेहऱ्याला बँकेतील खात्याशी डिजिटल पेमेंट प्रणालीसोबत लिंक करावे लागते. सुमारे वर्षभरापूर्वीच ही सेवा चीनमध्ये लाँच झाली होती आणि चीनमधील १०० शहरांमध्ये आता या सेवेचा विस्तार झाला आहे.

मोठ्या प्रमाणात “फेशियल रिकॉग्निशन सॉफ्टवेअर’ला पहिल्यापासून वापरले जात आहे. ही प्रणाली लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी अत्यंत उपयोगी सिद्ध झाली आहे. या प्रणालीचा वापर आता व्यवहारासाठीदेखील करण्यात येत आहे. या पेमेंट प्रणालीसंदर्भात लोकांच्या मनामध्ये डाटा चोरी किंवा खासगी माहिती लीक होण्यासारखीही भीती आहे. पण असे असले तरी या प्रणालीला लोकांनी अत्यंत तेजीने स्वीकारले आहे. चीनची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अलिबाबाचा फायनान्शियल विभाग अली-पे या सेवेमध्ये अव्वल स्थानी आहे. चीनमधील सुमारे १०० शहरांमध्ये अली-पेच्या फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर होत आहे.

भारतामध्ये अत्यंत मर्यादित फेशियल रिकॉग्निशन टेक्नॉलॉजीचा वापर होतो. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवेशासाठी अलीकडेच याचा वापर करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याची प्राथमिक चाचणी झाली आहे. डिजिटल पेमेंटसंदर्भातील काही कंपन्याही या तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर विचार करत आहेत. मात्र, ही सेवा कधी लाँच होईल, या संदर्भात सध्या काहीही स्पष्ट सांगता येत नाही.

Leave a Comment