इस्रोच्या वैज्ञानिकांचे न्यूयॉर्क टाइम्सकडून कौतुक


नवी दिल्ली – जगभरातील माध्यमांनी प्रामुख्याने भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेची दखल घेतली आहे. इस्रोने चंद्राच्या ज्या भागात जायचे धाडस दाखवले त्याबद्दल इस्रोचे भारतातूनच नव्हे तर जगभरातून कौतुक होत आहे. विक्रम लँडरचे लँडिंग यशस्वी ठरले असते तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला असता.

अमेरिकन मॅगझिन वायर्डच्या ऑनलाइन एडिशनने मार्गावरुन चांद्रयान-२ चा लँडर जरी भरकटला असला तरी मोहिमेसाठी सर्व काही संपलेले नाही असे म्हटले आहे. भारताच्या अवकाश कार्यक्रमासाठी चंद्रावर उतरणाऱ्या विक्रम लँडर आणि त्यातील विक्रम रोव्हरचा तुटलेला संपर्क हा एक झटका आहे. पण मोहिमेसाठी सर्व काही संपलेले नाही असे वायर्डने म्हटले आहे.

तर न्यूयॉर्क टाइम्सने जागतिक उदिद्ष्टय डोळयासमोर ठेऊन अनेक दशकापासून सुरु असलेल्या भारताच्या अवकाश विकास कार्यक्रमाचे आणि इंजिनिअरींग कौशल्याचे कौतुक केले आहे. चंद्रावर चांद्रयान-२ चा लँडर उतरु शकला नसला तरी ते अंशत: अपयश आहे. ऑर्बिटर कार्यरत राहणार आहे. फक्त चंद्रावर पोहोचणाऱ्या देशांच्या पंक्तीत पोहोचायला भारताला थोडा वेळ लागेल असे न्यूयॉर्क टाइम्सने लिहिले आहे.

भारताचा लँडर बरोबरचा संपर्क चंद्रावर लँडिंगची प्रक्रिया सुरु असताना तुटला. भारताच्या वाढत्या अवकाश महत्वकांक्षेला हा धक्का आहे. आतापर्यंत चंद्रावर ३८ वेळा सॉफ्ट लँडिंगचे प्रयत्न झाले त्यातील फक्त निम्म्यावेळा यश मिळाले. चांद्रयान-२ मुळे चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरेल अशी भारताला अपेक्षा होती. याआधी अमेरिका, रशिया आणि चीनने चंद्रावर यशस्वी लँडिंग केले आहे असे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.

Leave a Comment